Accident News: साई पालखीसोबत पायी चालत जाणाऱ्या तिघा साईभक्तांवर काळाने झडप घातली आहे. भरधाव कारच्या धडकेत तीन साईभक्तांचा मृत्यू झाला आहे. घोटी-सिन्नरदरम्यान ही घटना घडली असून, तिन्ही जण टिटवाळा मांडा कोळीवाडा परिसरातील रहिवासी होते.
या अपघातात भावेश राम पाटील, रवींद्र उर्फ कवी सुरेश पाटील, आणि साईराज भोईर या तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघाताला १६ तासांहून अधिक कालावधी उलटून गेला तरी पोलिसांनी वाहनचालकाला शोधलेले नाही, तसेच कारवाई केलेली नाही, असा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.
अधिक माहिती अशी: साई आश्रय सेवा मंडळातर्फे शिर्डी येथे पायी चालत पालखी नेली जाते. या पालखीत या परिसरातील सुमारे दीडशे जण सहभागी होतात. यंदा देखील शनिवारी, १३ तारखेला पालखी टिटवाळ्याहून शिर्डीच्या दिशेने पायी निघाली. या पालखीसोबत रवींद्र पाटील, भावेश पाटील, साईराज भोईर, आणि सलमान खान हे चौघे होते.
मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पालखी घोटी आणि सिन्नरदरम्यान पोहोचली. रवींद्र पाटील, भावेश पाटील, साईराज भोईर, आणि सलमान खान या चौघांना भरधाव वाहनाने उडवले. या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सलमानवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.