अहमदनगर। नगर सहयाद्री
मुलीच्या लग्नाचे निमंत्रण नातेवाईकांना देण्यासाठी पती समवेत दुचाकीवर चाललेल्या महिलेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नगर तालुयातील वाळकी येथे शनिवारी (दि. ३०) दुपारी घडली. सुवर्णा भाऊसाहेब भोर (वय ४० रा. चास ता. नगर) असे मयत महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुवर्णा भोर यांच्या मुलीचे येत्या ५ एप्रिलला लग्न होते. त्याचे निमंत्रण नातेवाईकांना देण्यासाठी तसेच एका नातेवाईकाच्या घरी वाळकी येथे शनिवारी दुपारी लग्न असल्याने त्या त्यांचे पती भाऊसाहेब भोर यांच्या समवेत दुचाकीवर चास येथून वाळकीला जात होत्या.
वाळकी गावाजवळ शाळेच्या समोर गतिरोधकावर त्यांची दुचाकी आदळल्याने सुवर्णा या उडून रस्त्यावर पडल्या. त्यात त्यांच्या डोयाला गंभीर दुखापत झाली. त्यांना पती व इतर नातेवाईकांनी तातडीने नगरला एका खासगी रूग्णालयात नेले मात्र तेथील डॉटरांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले.