अहमदनगर। नगर सहयाद्री-
लोकसभेच्या नगरच्या जागेसाठी अनेक इच्छुक आहेत. त्या सर्वांच्या नावाची चर्चा होत आहे. पक्षाच्या निरीक्षकांनी अहवाल सादर केला आहे. त्यावर मुख्य निवडणूक समिती निर्णय घेईल. महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे वेळ लागतो आहे असे वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. तसेच त्यांनी महानाट्यावर लवकरच पडदा पडेल असे वक्तव्य करत आ. नीलेश लंके यांनाही अप्रत्यक्ष टोला लगावला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नगर उपकेंद्राचे इमारतीचे उदघाटन मंत्री विखे पाटील यांच्या होते झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी आ. लंके यांच्यावर अप्रत्यक्ष टोला मारत टीका केली आहे. ते म्हणाले, महानाट्य दोन किंवा जास्तीत जास्त तीन अंकी असते. त्यावर लवकर पडदा पडेल. महानाट्य फारकाळ चालणार नाही. लोकसभेसाठी कोण कुठे जाते, याची मला चिंता नाही.
कारण महायुतीला राज्यात शंभर टक्के यश मिळणार आहे. त्यामुळे कोण कोणाच्या मानेवर जाऊन बसते याला मी फार महत्त्व देत नाही, असा टोला मंत्री विखे यांनी अप्रत्यक्षपणे आमदार निलेश लंके यांच्या लोकसभा निवडणुकीतील संभाव्य भूमिकेवर लगावला आहे.
मराठा समाजाच्या प्रश्नाचे राजकारण करणे बंद करा
मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलेले आहे. विधानसभा आणि विधान परिषदेने ते मान्य केलेले आहे. महायुती सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली असे विजय वडेट्टीवारांना वाटत असेल, तर ते विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी सभागृहात तसे सांगितले पाहिजे होते. तेव्हा तर ते म्हणाले, एकमताने ठराव करा. आता त्यांना कोणती उपरती सुचली आहे? मराठा समाजाच्या प्रश्नाचे राजकारण करणे बंद केले पाहिजे, असा टोला महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वडेट्टीवार यांना लगावला.