शरद झावरे | नगर सह्याद्री
लोकसभा निवडणुकीसाठी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष व उबाठा शिवसेनेचे माजी आमदार विजयराव औटी यांनी महाविकास आघाडीशी फारकत घेत महायुतीचे उमेदवार भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या बरोबर जाण्याची भूमिका बुधवारी जाहीर केली आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी माजी आमदार विजय औटी यांनी शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह रामदास भोसले, प्रियंका खिलारी, अनिल शेटे यांच्याशी चर्चा करत हा निर्णय घेतल्या असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे दक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडणूक रंगात आली असताना उबाठाचे माजी आमदार विजय औटी यांच्या निर्णयाने पारनेर तालुयातील महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे.त्यामुळे उबाठा शिवसेनेचे नेते यावर काय भाष्य करतात किंवा भूमिका येतात याकडेही तालुयाचे व शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे उबाठा शिवसेनेचे नगरचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्यासह संदेश कार्ले, विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर हे महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी निलेश लंके यांच्या प्रचारावर आघाडी असताना माजी आमदार विजय औटी यांच्या भूमिकेमुळे उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
गेल्या एक महिन्यापासून उबाठा शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांनी या लोकसभेच्या निवडणुका संदर्भात आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली होती. अखेर बुधवारी यावर निर्णय घेतला असून ते महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी खुद्द दिली आहे.
सध्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून जिल्हात व अनेक तालुयात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग येत आहे. लोकसभा निवडणुकीत रंगात आली असताना अनेक तालुयात स्थानिक पातळीवरील सह अनेक प्रमुख पक्षाचे नेते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नीलेश लंके तर भाजपचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांना पाठिंबा देत आपले भूमिका व्यक्त करू लागले आहे.
उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या भूमिकेकडे लक्ष
राज्यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा लोकसभा निवडणूक साठी सत्ता संघर्ष रंगला असताना पारनेर मध्ये महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. माजी आमदार विजय औटी यांची भूमिकेमुळे जिल्ह्यातील व तालुयातील शिवसैनिक नाराज झाले असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व प्रवक्ते खासदार संजय राऊत काय भूमिका घेतात याकडेही जिल्ह्याचे व तालुयाचे लक्ष लागले आहे.