धाराशिव / नगरसह्याद्री : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानी देवीच्या अत्यंत मौल्यवान दागदागिन्यांच्या चोरी प्रकरणात अखेर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून यात चार महंत, धार्मिक व्यवस्थापक, सेवेदार, अधिकारी व कर्मचार्यांचा समावेश आहे.
तुळजाभवानी देवीचे प्राचीन, मौल्यवान दागिने चोरी प्रकरणात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महंत हमरोजीबुवा, महंत चिलोजीबुवा गुरू हमरोजी बुवा, महंत वाकोजीबुवा गुरू, तुकोजी बुवा आणि महंत बजाजी बुवा गुरू वाकोजी बुवा या चार महंतांसह मृत सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अंबादास भोसले, सेवेदार पलंगे आणि मंदिरातील अज्ञात अधिकारी, कर्मचारी यांचा त्यात समावेश आहे.
जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिलेल्या आदेशानंतर आठवडाभराने तुळजापूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला. या गंभीर प्रकरणाचा तपास करण्यासाठी उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची स्वतंत्र चौकशी समिती गठीत केली जाणार आहे.