नाशिक / नगर सह्याद्री : आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आलेल्या आहेत. अनेक आध्यात्मिक गुरू, महंत निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशा चर्चा आहेत. अनेक महाराजही या लोकसभेच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे. आता बाबाजी भक्त परिवाराचे शांतीगिरी महाराजदेखील रिंगणात उतरणार आहेत. नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर अशा दोनपैकी एका मतदारसंघापैकी एका ठिकाणी ते लढणार असले तरी त्यांनी निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची वेळ मागितल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागणारे आध्यात्मिक गुरू भाजपाकडे असल्याचे दिसते आहे. मात्र, शांतीगिरी महाराज यांनी मनसेकडे कल दाखवल्याचे दिसत आहे. राज ठाकरे नाशिकमध्ये तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत.
नाशिक लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला असला तरी अद्याप उमेदवारी निश्चित नाही. तुम्ही तयारी करा मी उमेदवारीचे बघून घेईल, असे राज ठाकरे यांनी गेल्या वेळी नाशिकच्या दौऱ्यात घेतलेल्या बैठकीत सांगितले होते. त्यातच आता प. पू. १००८ महामंडालेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांनी नाशिकमध्ये राज ठाकरे यांच्या भेटीची वेळ मागितल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.