अहमदनगर। नगर सहयाद्री-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर आता राज्य शासनाच्या पत्रानुसार नगर महापालिकेच्या महासभेत प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी (दि.१) सायंकाळी मंजूर केला आहे.
अहमदनगरच्या नामांतराचा विषय अनेक वर्षांपासून सुरू आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहिल्यानगर नाव देण्याची मागणी पुढे करत महापालिकेला पत्र दिले होते. मात्र, मनपात असलेल्या महाविकास आघाडीच्या सत्ताधार्यांनी याबाबत ठराव न करता प्रस्ताव प्रलंबित ठेवला होता.
दरम्यानच्या काळात अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामकरण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केला होता. मात्र, महापालिकेचा ठराव नसल्याने राज्य शासनाला याबाबत पुढील कार्यवाही करता येत नव्हती. आता महापालिकेत प्रशासक राज असून राज्य शासनाने २८ डिसेंबर रोजी महापालिकेला नामांतराचा ठराव करून पाठवण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार प्रशासक जावळे यांनी शुक्रवारी अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर केला. महापालिकेने नामातराचा ठराव केला असून, जिल्हाधिकार्यांमार्फत हा ठराव शासनाकडे पाठविण्यात आला असल्याचे प्रशासक जावळे यांनी सांगितले.