सारिपाट / शिवाजी शिर्के-
Ahmednagar Breaking : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना मतदारसंघांची चाचपणी देखील प्रत्येक राजकीय पक्षाकडून चालू आहे. नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे [MP Sujay Vikhe Patil] यांची उमेदवारी अंतिम असल्याने त्यांची साखरपेरणी जोरात चालू आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून पारनेरचे आ. नीलेश लंके [MLA Nilesh Lanke] यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, अजित पवार यांच्यासोबत ते आहेत. शरद पवार गटाकडून लंके यांच्या नावाची चर्चा असली तरी आ. लंके यांची तळ्यातमळ्यात भूमिका असल्याने आता शरद पवार गटाकडून नगरच्या जागेसाठी सुप्रिया सुळे [MP Supriya Sule] यांच्या उमेदवारीसाठी चाचपणी चालू झाली आहे. बारामती मतदारसंघातून मागील निवडणुकीत मिळालेला निसटता विजय आणि आता अजित पवार गटाने या मतदारसंघासाठी कसलेली कंबर पाहता सुप्रिया सुळे यांच्यासाठी राज्यातील दुसरा सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ म्हणून नगरकडे पाहिले गेले आहे. सुळे [NCP] यांची उमेदवारी अंतिम झाल्यास डॉ. विखे [BJP] यांच्यासमोर तगडे आव्हान उभे राहू शकते आणि पवार विरुद्ध विखे अशी थेट लढत राज्यात लक्षवेधी होणार!
बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे या सन २००९, २०१४ आणि २०१९ अशा सलग तीन टर्ममध्ये लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. मागील म्हणजेच २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुळे यांचे मताधिक्य मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. या मतदारसंघातील दौंड विधानसभा मतदारसंघातून त्यांना अपेक्षेपेक्षा कमी मताधिक्य मिळाले. इंदापूर आणि बारामती या दोन मतदारसंघात त्यांना मताधिक्य मिळाले असले तरी बारामतीतील घटलेला मतांचा टक्का आत्मचिंतनास भाग पाडणारा ठरला.
पुरंदर आणि भोर या दोन विधानसभा मतदारसंघातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती. शहरी मतदार असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना विरोधी उमेदवारापेक्षा कमी मते मिळाली होती. राष्ट्रवादीमध्ये पडलेली फूट आणि बदललेली राजकीय समिकरणे पाहता हा मतदार संघ आता सुप्रिया सुळे यांच्यासाठी नक्कीच सुरक्षित राहिलेला नाही. बारामतीच्या होमग्राऊंडवर तीनवेळा जिंकलेल्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी राज्यातील सुरक्षित मतदारसंघ कोणता याची चाचपणी चालू असताना आता त्यात नगरचे नाव अग्रक्रमावर असल्याचे सुत्रांनी सांगितले.
शरद पवार यांची नगर जिल्ह्याच्या राजकारणावर कायमच पकड राहिली. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतरही शरद पवार यांनी नगरची पकड कायम ठेवली. नगर लोकसभा मतदारसंघातील पारनेर, राहुरी, नगर शहर आणि कर्जत-जामखेड या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. यातील पारनेरचे नीलेश लंके आणि नगर शहराचे संग्राम जगताप हे दोन आमदार अजित पवार यांच्या गटासोबत गेले आहेत. पाथर्डी आणि श्रीगोंदा या दोन विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार असले तरी या दोन्ही मतदारसंघावर शरद पवार गटाची पकड आहे.
अजित पवार गटासोबत गेलेल्या पारनेरचे आ. लंके यांना लोकसभेचे वेध लागलेले असले तरी त्यांना अजित पवार गटाची साथ सोडली तरच उमेदवारी मिळू शकते. मात्र, त्यांनी अद्याप अशी भूमिका घेतलेली नाही. आ. लंके हे अजित पवार गटासोबत राहिले तरी ते महायुतीचे संभाव्य उमेदवार असणार्या डॉ. सुजय विखे यांच्या विरोधातच राहणार हे नक्कीच! त्यामुळे पारनेर, राहुरी, कर्जत-जामखेड या तीन विधानसभा मतदारसंघात मोठी ताकद सुप्रिया सुळे यांना मिळू शकते, असा कयास बांधला जात आहे.
नगर शहरात आ. संग्राम जगताप यांची मोठी ताकद आहे. डॉ. सुजय विखे यांच्याशी त्यांचा असणारा घरोबा सर्वश्रूत आहे. राष्ट्रवादीचा लोकसभेचा उमेदवार कोणीही असला तरी नगर शहरातून त्या उमेदवाराला मताधिक्य मिळणे अवघड आहे. अर्थात, त्यास विखे-जगताप यांची मैत्री जशी कारणीभूत असणार आहे तसेच कारणीभूत असणार आहे विखे यांचे शहरातील काम! त्याच्या जोडीने उभे केलेले संघटन आणि कार्यकर्त्यांशी थेट संपर्क!
राहुरी मतदारसंघात आ. प्राजक्त तनपुरे यांना दिली गेलेली ताकद आणि त्यातून झालेली कामे ही सुप्रिया सुळे यांची जमेची बाजू असणार आहे. कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार यांनी एकहाती मार्गी लावलेली कामे आणि त्यातून त्यांची निर्माण झालेली इमेज महत्वाची ठरणार आहे. याशिवाय या दोन्ही तालुक्यांमध्ये शरद पवार यांचा थेट संपर्क आहे. कार्यकर्त्यांचे मोठे जाळे थेट थोरल्या पवारांच्या संपर्कात आहे. श्रीगोंद्यात पवारांनी मागील विधानसभा निवडणुकीत अवघ्या पंधरा दिवसाच्या निवडणुकीत घनश्याम शेलार यांच्यामागे ताकद उभी करत बबनराव पाचपुते यांना घाम फोडला होता. पाथर्डी-शेवगावमध्ये ढाकणे-घुले यांची ताकद निर्णायक आहे.
एकूणच सुप्रिया सुळे यांच्यासाठी नगर लोकसभा मतदारसंघ सुरक्षित असल्याचा अहवाल तयार झाला आहे. या अनुषंगाने आता प्रमुख कार्यकर्त्यांशी दस्तुरखुद्द शरद पवार संपर्क साधून आहेत. जयंत पाटील आणि जिल्ह्यातील दहा-बारा नेते यांची या अनुषंगाने बैठकही झाली आहे. काँग्रेसचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्याकडून देखील सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील मिळाल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले. शिवसेनेचे आ. शंकरराव गडाख यांच्याकडूनही याबाबत हिरवा कंदील मिळाला असल्याने सुळे यांच्या उमेदवारीबाबत लवकरच निर्णय होईल, असे सांगितले जात आहे. सुप्रिया सुळे यांची उमेदवारी अंतिम झाल्यास नेहमी पडद्याआड चालणारे पवार विरुद्ध विखे ही लढाई थेट आमने-सामने होणार यात शंका नाही. त्यामुळेच सुळे यांची उमेदवारी झाल्यास ती राज्यात लक्षवेधी ठरणार आहे.