अहमदनगर। नगर सहयाद्री
जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील देडगावामधून एक भयंकर प्रकार समोर आला आहे. एका पुरुषाचा खून करून शरीराचे तुकडे तुकडे करून मुळा कालव्याच्या पाटात टाकल्याची घटना उकडकीस आली आहे. याबाबत देडगावचे पोलीस पाटील प्रल्हाद यशवंत ससाणे (वय-४७) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अधिक महिती अशी: देडगावचे पोलीस पाटील प्रल्हाद यशवंत ससाणे यांना दि.१६ मे रोजी सरपंच चंद्रकांत भानुदास मुंगसे यांनी देडगावच्या हद्दीतील पाटात एका माणसाच्या पायाचा तुकडा पाण्यावर तरंगत आहे, अशी माहिती दिली.
त्यानंतर पोलीस पाटील यशवंत ससाणे यांनी घटनास्थळी धाव घेत कुकाणा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस नाईक किरण पवार यांना माहिती दिली. त्यानंतर काही वेळाने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व पोलीस नाईक किरण पवार हे घटनास्थळी आले.
घटनास्थळी पाहणी केली असता मांडी असलेला कुजलेला मांसाचा तुकडा मिळून आला. त्यानंतर पुढे काही अंतरावर एका पिवळ्या रंगाच्या गोणीमध्ये अनोळखी मानवी कुजलेले पुरुष जातीचे मुंडके, धडाचा कुजलेला मांसाचा तुकडा, त्यास करदोरा व गुडघ्याचा कुजलेला मांसाचा तुकडा मिळून आला.
पोलिसांनी दोन पंचासमक्ष पंचनामा केला. कुजलेले मांसाचे तुकडे हे पोस्टमार्टमसाठी ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.