अहमदनगर। नगर सहयाद्री-
रस्त्याच्या वादातून शेतकऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा शिवारात घडली. दादाभाऊ गोरख वाबळे (वय ३२ रा. पिंपळगाव वाघा) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सदरची घटना बुधवारी (दि. ६) दुपारी १२ ते साडेबाराच्या सुमारास झाली असून जखमी दादाभाऊ वाबळे यांनी रुग्णालयात पोलिसांना दिलेल्या जबाबावरून नगर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमिनाथ बाजीराव वाबळे (रा. पिंपळगाव वाघा) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान सदरची घटना समजताच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) संपत भोसले, सहा. पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
दादाभाऊ वाबळे हे सोमिनाथ यांना रस्ता करून देत नव्हते म्हणून सोमिनाथ याने दादाभाऊ यांच्या अंगावर पेट्रोल टाकून व काडी लावून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहा. पोलीस निरीक्षक गिते अधिक तपास करत आहेत.