अहमदनगर। नगर सहयाद्री
हॉटेल चालकाचा डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करत हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नगर जिल्ह्यातील एका गावात घडला आहे. बाळासाहेब सखाहरी तुवर (वय ६०) रा. कारबाडी (पाचेगाव) ता. नेवासा असे खून झालेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीरामपूर नेवासा मार्गावरील बेलपिंपळगाव शिवारात बाळासाहेब तुवर यांनी नानासाहेब संत यांचे चहा व बडापावचे हॉटेल ८ महिन्यापासून भाड्याने चालवायला घेतले होते. मंगळवार दि. १२ मार्च २०२४ रोजी दिवसभर हॉटेलचा व्यवसाय करून रात्री हॉटेल बंद करून ते झोपले होते.
मात्र आज बुधवार दिनांक १३ मार्च रोजी सकाळी ८ वाजता हॉटेल का उघडले नाही ? म्हणून नागरिकांनी हॉटेल चालकास आवाज दिला. परंतु आतून काही प्रतिसाद न आल्याने त्यांनी खिडकीतून व दरवाजातून डोकावून पाहिले असता बाळासाहेब तुवर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बाळासाहेब सखाहारी तुवर यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला असून मयत बाळासाहेब सखाहरी तुवर यांचा पुतणे विष्णू गंगाधर तुवर (वय ३७) रा. पाचेगाव यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.