नागपूर / नगर सह्याद्री : बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सध्या सर्व उमेदवारांचे डोळे लागले आहेत. हा निकाल कधी लागतो याही प्रतीक्षा लाखो तरुण मागील महिन्यापासून करत आहेत. दरम्यान या भरतीमधील २ हजार ८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ उमेदवारांकडून आक्षेप आलेले होते,
१४६ प्रश्नांमध्ये करण्यात येणारी दुरुस्ती आदी अनेक अडचणींमुळे निकालास विलंब होत आहे. असून आठ लाख उमेदवार या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. आता हा निकाल जानेवारीपर्यंत जाहीर होणार असल्याची शक्यता अपर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षा राज्य समन्वयक सरिता नरके यांनी वर्तवली आहे.
तलाठी भरती परीक्षेसाठी आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत घेतली गेली. त्यानंतर उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसूचीबाबत काही आक्षेप, हरकती असल्यास त्या नोंदवण्यासाठी २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत मुदत देण्यात आली होती.
संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ आक्षेप उमेदवारांकडून नोंदवण्यात आले. या आक्षेपांपैकी एकूण वैध १४६ प्रश्नांसाठी घेतलेले ९०७२ आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरवण्यात आले आहेत. दरम्यान, परीक्षेत एकूण ५७०० प्रश्न होते. आक्षेप नोंदवण्याच्या कालावधीत आलेल्या आक्षेपांपैकी नऊ हजार आक्षेप टीसीएस कंपनीने ग्राह्य धरले. त्यानुसार १४६ प्रश्नांमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे.
त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया लांबली असल्याची माहिती नरके यांनी दिली. मोठ्या संख्येने उमेदवार असणे आणि आक्षेपानंतर आलेल्या अडचणी बघता निकालाला विलंब हाेत असल्याची माहिती त्यांनी दिली. निकालासंदर्भातील बहुतांश काम पूर्ण होत आले आहे. गुणवत्ता यादी तयार करणे, जिल्हानिहाय निकाल जाहीर करणे असे काम सुरू आहे. त्यामुळे जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होईल अशी अपेक्षा नरके यांनी व्यक्त केली.