पारनेर | नगर सह्याद्री
रक्तचंदनाची कंटेरमधून बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोन चंदन तस्करांना पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पिंपरी चिंचवड पोलीसांनी पकडले. त्यांच्याकडून 25 कोटी रुपयांचे रक्तचंदन जप्त करण्यात आले. राजाराम गंगाराम गावखे (वय-37, रा. काळेवाडी, सावरगांव ता. पारनेर) व हरप्रितसिंग धरमसिंग बदाना (रा. ठाणे) यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान पिंपरी पोलिसांनी गाडी मालक दिपक साळवे (रा. टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर) यालाही गुरुवारी रात्री ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरुन कोट्यावधी रुपयांच्या रक्तचंदनाची तस्करी होणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी द्रुतगती मार्गावरील उसें टोलनाक्यावर सापळा लावून सिलबंद असलेल्या चाळीस फूट कंटेनर पकडला. कंटेनरसोबत असलेल्या इतर व्यक्तींची चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली.
कंटेनर चालक तसेच त्यासोबत असलेल्या इतरांकडून प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनी वन विभागाचे अधिकारी तसेच पंचासमक्ष कंटेरनचे सील तोडून पाहणी केली असता त्यात तब्बल 25 कोटी रुपये किंमतीचे रक्तचंदन आढळून आले. दरम्यान पोलिसांनी अधिक तपास केला असता कंटेरचा मालक दिपक साळवे यांना रात्री पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गाडीला दोन लाखांचे भाडे
तब्बल 25 कोटी रुपये किंमतीचे रक्तचंदनाची वाहतूक करणारा कंटेनर पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे-मुंबई ध्रुतगती मार्गावर पकडला. पोलिसांनी कंटेनर मालकाला ताब्यात घेतले आहे. गाडीचा वापर रक्तचंदन तस्करीसाठी होणार असल्याची माहिती गाडी मालकाला होती. त्यासाठी गाडीला दोन लाखांचे भाडे ठरले असल्याची माहिती समोर आली आहे.