मुंबई / नगर सहयाद्री : Maharashtra Politics News : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या प्रकरणावर आपला निकाल दिला होता. याच्या विरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी पार पडली असून सुप्रीम कोर्टाने शरद पवार गटाला सात दिवसात चिन्ह देण्यात यावे, असे निर्देश दिलेत.
तसेच सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला उद्देशून काही प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांवर अजित पवार गटाला पुढच्या दोन आठवड्यांमध्ये उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीवर शरद पवार गटाकडून आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. या दोन्ही नेत्यांनी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर समाधान व्यक्त केलं. त्यानंतर आता स्वत: शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. शरद पवार यांनी ट्विटरवर (X) प्रतिक्रिया दिली आहे. हा लोकशाहीचा मोठा विजय आहे, अशी पहिली प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभदिनी दिवशी, भारताच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला अंतरिम दिलासा दिला आहे. हा मतदारांचा विजय आहे, कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने देशातील मतदारांना कमी लेखू नये, असे निरीक्षण नोंदवले आणि मूळ पक्षाच्या तिकिटावर उमेदवार लढले त्याचे काय? असा प्रश्न देखील उपस्थित केला. आम्हाला पूर्णपणे मान्यता देऊ नये या मागणीवर जोरदार टीका करण्याव्यतिरिक्त, अशाच वादामुळे अंतिम मुद्यावरील संबंधित परिस्थितीचा उल्लेख केला आहे”, असं शरद पवार यांनी नमूद केलं.