संगमनेर / नगर सह्याद्री : लोकसभा निवडणुकीआधी भाजप विविध राजकीय खेळी करण्याच्या तयारीत आहे. भाजपला ३७० जागा निवडणून आणावयाच्या आहेत. त्यामुळे भाजप सध्या काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या हिकानी कधी भाजपला यश मिळालेलं नाही अशाही जागा भाजपला जिंकावायच्या आहेत. त्यासाठी भाजपने अनेक काँग्रेसचे नेत्यांसाठी आपली दारे खुली केली आहेत. भाजपने यासाठी चार सदस्यीय समितीही नेमली असल्याची माहिती आहे.
दरम्यान आता यात आ. बाळासाहेब थोरात यांचेही नाव समोर येऊ लागले आहे. त्यातच आता भाजप खासदार सुजय विखे यांनी मोठं सूचक वक्तव्य केले आहे. बाळासाहेब थोरात हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असल्याचं सुजय विखे यांनी म्हटल असून त्यामागचे कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे.
खा. सुजय विखे पाटील यांचे नेमकं म्हणणं काय?
लोणावळा येथे पार पडलेल्या काँग्रेस कमिटीच्या मेळाव्या दरम्यान बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका केली होती, त्यावर भाजपाचे खासदार सुजय विखे यांना प्रश्न विचारले असता त्यांनी थोरातांबद्दल सूचक वक्तव्य केलं आहे. बाळासाहेब थोरात भाजपात येतात असं माझ्या कानावर आलं आहे. त्याचं कारण म्हणजे मागच्या एक महिन्यात जेवढे कार्यक्रम झाले,
त्यामध्ये एकाही कार्यक्रमाच्या बोर्डवर ना सोनिया गांधींचा फोटो आहे ना राहुल गांधींचा फोटो आहे. त्यामुळे वरचे नेत्यांचे फोटो गायब का झाले? याला दोनच कारण असू शकतात. माणूस एक तर दुसरीकडे जातोय किंवा त्यांचे फोटो टाकून ते पडतील अशी त्यांची भीती असेल, असा टोला देखील सुजय विखे पाटील यांनी लगावला आहे. त्यामुळे आता खा. विखे यांच्या वक्तव्यानंतर मात्र अनेक चर्चांना उधाण आले आहे.