मुंबई / नगर सहयाद्री : एसआयटी चौकशीच्या धाकाने मराठा आंदोलन चिरडता येणार नाही. ‘एसआयटी चौकशी करायचीच असेल तर, भाजप नेत्यांनी केलेल्या चितावणीखोर भाषणांचीही करावी. ‘शासन तुमच्या दारी’ या उपक्रमात वापरलेल्या बस आणि सभांच्या खर्चाचीही करावी, असं प्रतिआव्हान सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक करण गायकर यांनी दिलं आहे. भाजप आमदारांच्या मागणीनंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलेल्या धमकीची एसआयटी चौकशी करण्याचा आदेश दिला. त्यानंतर जरांगे समर्थक कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत.
सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलन दडपण्यासाठी दबाव आणणाऱ्या आमदारांना मतदारसंघात गेल्यावर जनतेला काय उत्तर द्यावं लागेल? असा प्रश्न करण गायकर यांनी उपस्थित केला.
या संदर्भात गायकर म्हणाले, मनोज जरांगे पाटील सलग 17 दिवस उपोषण करत आहेत. त्याकडे राज्य सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. पेरलेल्या लोकांकडून खोटे आरोप करून त्यांची बदनामी सुरू केली. अशा स्थितीत जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यात त्यांची काय चूक आहे? त्यांना जाणीवपूर्वक असे करण्यास भाग पाडण्यात आले, असं म्हटल्यास वावगे काय, असा प्रश्न त्यांनी केला.
‘या’ आमदारांचीही चौकशी व्हावी
सरकारला चौकशीच करायचीच असेल तर, मुंबै बँक घोटाळ्याचे आरोप असलेल्या आमदार प्रवीण दरेकर यांचीही करावी, दहीहंडीच्या कार्यक्रमात मुली पळवून आणण्याची भाषा करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांच्या विधानाचीही चौकशी करावी, चिथावणी देणारे आमदार शेलार यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करण गायकर यांनी केली.
दरम्यान, मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून दोन दिवसांपूर्वी नाशिक शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला होता. तेव्हा पोलिसांनी आंदोलनाविरुद्ध गुन्हे दाखल करताना फक्त मराठा आंदोलकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्याची टीका अखिल भारतीय मराठा महासंघाचे शहराध्यक्ष संजय फोटो यांनी केली आहे.