अहिल्यानगर। नगर सहयाद्री;-
राजकीयदृष्ट्या प्रबळ असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे. तसेच, राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा हा जिल्हा आहे. या जिल्ह्यात सर्व प्रकारच्या क्राईमच्या घटना घडत असल्याने पोलिसांसाठी हा आव्हानात्मक जिल्हा आहे. पोलिसांकडून नागरिकांना अनेक अपेक्षा असतात. नागरिकांच्या या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी मिळून प्रयत्न करतील, असे प्रतिपादन नूतन पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.
अधीक्षक घार्गे यांनी शुक्रवारी पदाचा कार्यभार स्वीकारताच सर्व विभागांचा आढावा घेतला. त्यानंतर पोलिस मुख्यालयात पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना निरोप देऊन नूतन अधीक्षक घार्गे यांचे पोलिस दलाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी ओला यांनी त्यांचे स्वागत केले. अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, वैभव कलुबर्मे आदींसह सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. अधीक्षक घार्गे म्हणाले की, महिला, ज्येष्ठ नागरिक, बालक, विविध समाज घटक डोळ्यासमोर ठेवून काम केले जाईल. कर्मचाऱ्यांचे प्रश्नही सोडवले जातील. नागरिकांना तत्काळ मदत मिळेल, यादृष्टीने काम करू, असेही ते म्हणाले.
दरम्यान, अधीक्षक ओला म्हणाले, जिल्ह्यात मनुष्यबळ कमी आहे. त्या तुलनेत गुन्हेगारी जास्त असल्याने पोलिसांवर कामाचा ताण निश्चित आहे. वाढते गुन्हे आणि मोठा जिल्हा, यामुळे या जिल्ह्यात काम करणे मोठे आव्हान होते. लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणूका पार पाडण्याचे मोठे आव्हान पोलिस प्रशासनासमोर होते. या दोन्ही निवडणूक शांततेत पार पडल्या. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच जिल्ह्यात चांगले काम करता आले, असे ते म्हणाले. यावेळी अपर अधीक्षक प्रशांत खैरे, वैभव कलबुर्मे, पोलिस निरिक्षक दिनेश आहेर, उपअधीक्षक अमोल भारती, निरिक्षक आनंद कोकरे यांनी मनोगत व्यक्त केले.