अहमदनगर। नगर सहयाद्री-
केंद्र सरकारच्या वतीने नगर जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर ते आष्टी ते जामखेड (एनएच ५६१) राष्ट्रीय महामार्गाच्या संपूर्ण काँक्रीटीकरण कामासाठी ६५१.१५ कोटी रुपये, बेल्हा ते शिरूर ३८ किमी राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी ३८६.१६ कोटी आणि श्रीगोंदा शहरातील काष्टी- श्रीगोंदा- आढळगाव रस्त्यावर लेंडी नाला पुलाच्या बांधकामासाठी १०.५५ कोटी रुपये मंजूर झाले असल्याचे सुजय विखेंनी सांगितले.
सदर कामांसाठी नागरिकांनी वेळोवेळी माझ्याकडे मागणी केली होती. दरम्यान या मागणीवर योग्य तो पाठपुरावा केला आणि आज सदरील भरीव निधी हा या रस्त्याच्या आणि पुलाच्या बांधकामासाठी प्राप्त झाला आहे. एक लोकप्रतिनिधी या नत्याने जेव्हा जेव्हा शासनाकडे पाठपुरावा करतो, तेव्हा केंद्र सरकारच्या वतीने सकारात्मक निर्णय घेण्यात येतो या गोष्टीचा खरंच अभिमान वाटतो.
कारण प्रामाणिकपणे विकास कामे मार्गी लावणार्या लोकप्रतिनिधीला कुठल्याही निधीची कमतरता भासत नाही. त्याची विकासकामे ही सर्वांना दिसत असतात. निश्चितच केंद्र शासनाच्या वतीने यापुढे देखील असा भरघोस निधी उपलब्ध करून देण्यास मी सदैव कटिबध्द राहील असे मत देखील यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मांडले.
तसेच यावेळी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. तसेच नागरिकांना भेडसावणार्या विविध अडचणी सोडविण्यासाठी मी याप्रमाणेच तत्पर भूमिका घेत राहील असे सांगितले.