अहमदनगर / नगर सह्याद्री : यंदाच्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत वेट लिफ्टिंग क्रीडा प्रकारात पोलीस उपनिरीक्षक गणेश सुभाष चोभे यांनी सुवर्णपदक पटकावले. आता त्यांची अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
गणेश चोभे हे जळगाव जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षकपदी कार्यरत आहेत. केवळ गुन्हेगारांशी लढण्यातच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यात व इतरही क्षेत्रात पोलीस फिट असतात हेच त्यांनी दाखवून दिले.
३४ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२४ या स्पर्धा महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथे पार पडत आहेत. ४ ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत या स्पर्धा होत असून यात बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, ॲथलेटिक्स आदी वैयक्तिक स्पर्धा, हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल सारखे सांघिक असे १९ खेळांचा यात समावेश आहे. यामध्ये राज्यातील अंदाजे ३५०० पोलीस कर्मचारी सहभागी झाले आहेत.
यातील वेटलिफ्टिंग या खेळ प्रकारात पोलीस उपनिरीक्षक गणेश सुभाष चोभे यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीही त्यांनी विविध स्पर्धांमध्ये पदके पटकावली आहेत. त्यांना जळगावचे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, माहेश्वर रेड्डी, एलसीबीचे पोलीस निरीक्षक नजन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल पोलीस उपनिरीक्षक गणेश चोभे यांचे खा. सुजय विखे पाटील, आ.संग्राम जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, बाजार समितीचे माजी उपसभापती रेवणनाथ चोभे आदींसह बाबुर्डीबेंद ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.