spot_img
अहमदनगरइच्छुक अर्धाडझन तरीही श्रीगोंदेकरांमध्ये ‌‘सेटलमेंटचं सेंटीमेंट‌’

इच्छुक अर्धाडझन तरीही श्रीगोंदेकरांमध्ये ‌‘सेटलमेंटचं सेंटीमेंट‌’

spot_img

बबनराव पाचपुते विरोधकांमध्ये ‌‘भलतीच‌’ स्पर्धा | दबावतंत्रात टेंडर वाढवून घेतलं जात असल्याची जाहीर चर्चा | पाचपुतेंकडे कुटुंबातून कोण याचा निर्णय बाकी

मोरया रे…. । शिवाजी शिर्के:-
शारदीय नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने केडगावच्या देवीचं दर्शन घेऊन कायनेटिक चौकातून नगर शहरात मार्गस्थ होत असताना उजव्या बाजूला दौंडरस्त्याने बाप्पा अगदीच घाईने जाताना दिसला. इतक्या घाईने बाप्पा कुठं निघालाय याचं कुतूहल माझ्या मनात निर्माण झालं आणि मी त्याचा पाठलाग करु लागलो. अरणगावच्या अलिकडे बाप्पाला गाठलं! पेट्रोलपंपाच्या शेजारी असणाऱ्या टपरीवर चहा घेऊ असं मी त्याला खुनेनेच सांगितलं. टपरीच्या बाजूला गाडी लावून खुचवर बसत चहावाल्याला दोन कप चहा देण्याचं फर्मान सोडलं.

मी- बाप्पा, कुठं निघालास इतक्या घाईने इकडे दौंड रोडने?

श्रीगणेशा- श्रीगोंद्याकडे! राजकारण तापलंय तिथलं! बबनराव पाचपुतेंचं नक्की काय चाललंय हे नगरमध्ये समजून येत नाही. म्हणून काष्टीला जायचं ठरवलंय!

मी- बाप्पा, तुझं बरं आहे! मन होईल तिकडं सुटायचं आणि माहिती घेत बसायचं! नगर शहरातील लालटाकी परिसरातील जमिन घोटाळ्याची आणि त्यातील मोठ्या बकऱ्यानं खालेल्या मलाईची भानगड सांगणार होतास तू? काय झालं त्याचं?

श्रीगणेशा- होय रे सांगणार आहेच मी! नगर शहरात बरंच काही घडलंय! त्याबद्दलही बोलणार आहेच मी! मात्र, सध्या श्रीगोंद्याचा राजकीय आखाडा जरा जोरात दिसत आहे. लढतंय कोण याहीपेक्षा मीच लढणार अशा वल्गना केल्या जात आहेत आणि त्यातून आपला स्वत:चा भाव वाढवून घेतला जात आहे अशी चर्चा श्रीगोंद्यात रंगलीय! नक्की काय चाललंय हे जाणून घेण्याची गरज आहे.

मी- बाप्पा, तिथं साऱ्यांनाच वातावरण अगदी चांगलं आहे. मागच्यावेळी पराभूत झालेले घनश्याम शेलार यांनी अवघ्या 15 दिवसात 90 हजार मते घेतली होती आणि निसटता पराभव झाला होता. त्यामुळे पाचपुते यांच्या विरोधात यावेळी देखील त्यांना वातावरण चांगलच असेल असं दिसतंय!

श्रीगणेशा- घनश्याम शेलारांबाबबत तू बोललास ते खरं आहे. मात्र, यावेळी परिस्थिती बदलली आहे. आजारपणात मतदारसंघात दुर्लक्ष झाले आणि त्यातून पाचपुतेंची मतदारसंघावरील पकड निसटली असल्याची चर्चा झडत असताना पाचपुते यांच्या विरोधात कोण यासाठी तब्बल अर्धा डझन इच्छुकांनी मोट बांधलीय. मागील निवडणुकीत राहुल जगताप यांच्याबाबत ‌‘हे वागणं बरं नव्हं‌’ असं बोलणाऱ्या शरद पवार यांनी त्याच राहुल जगताप यांना जवळ केलंय हे लक्षात घ्यावं लागणार आहे. उमेदवार राहुल जगताप हेच असणार असं त्यांचे समर्थक बोलू लागलेत. दुसरीकडे मागीलवेळी राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह घेऊन लढलेल्या आणि मध्यंतरी बीआरएसचा झेंडा हाती घेऊन पुन्हा काँग्रेसमध्ये आलेले घनश्याम अण्णा हे उमेदवार मीच आणि ही जागा काँग्रेसला सुटणार असं सांगत आहेत. यावेळी मी थांबणार नाही. मी थांबलो तरी देहाने मविआसोबत असेल. माझे कार्यकर्ते मविआ सोबत असतीलच हे मी सांगू शकत नाही. 99 हजार मते मिळाली. गेली साडेचार वर्षात मतदारसंघातील गावात किमान दहावेळा गेलो असं ते जाहीरपणे सांगत आहेत.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार हे यावेळी कोणत्याही परिस्थितीत मी लढणार असं सांगत असून माघार घेणार नाही असंही स्पष्टपणे बोलून दाखवत आहेत. काँग्रेस- भाजपा- काँग्रेस आणि शेवटी राष्ट्रवादी अजित पवार गट असा प्रवास करणारे नागवडे यांनी तर यावेळी आरपारची लढाई करण्याचं ठरवलेले दिसतंय. सहकारासह अन्य बऱ्याच निवडणुकांमध्ये ‌‘छत्री‌’ निवडणूक चिन्ह घेऊन मतदारांसमोर गेलेल्या याच नागवडे यांनी यावेळी मविआची उमेदवारी मिळाली तर ठिक नाहीतर अपक्ष उमेदवारी करत हाती छत्री घेण्याची तयार केल्याचंही समजत आहे. गेल्या दहा- पंधरा वर्षात सर्वाधिक सेटलमेंट करणाऱ्यांमध्ये नागवडेंचा समावेश दिसतोय!

2014 मध्ये राज्य साखर संघाचं अध्यक्ष बापूंना मिळावं यासाठी पहिली सेटलमेंट. 2019 मध्ये कारखान्याला मदत व्हावी म्हणून भाजपात प्रवेश. 2023 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि कारखान्याला आर्थिक मदत मिळवून घेतली. त्यामुळे आता यावेळच्या निवडणुकीत नागवडे यांनी काहीतरी पदरात पाडून घेत सेटलमेंट केल्याचे दिसून आल्यास आश्चर्य वाटू नये. अण्णासाहेब शेलार यांनी 2014 मध्ये लढणार असंच म्हटले. त्यावेळी सेटलमेंट करुन त्यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद देण्यात आले. त्याच्या आधी हेच अण्णासाहेब शेलार हे बबनराव पाचपुते यांच्या आशीर्वादाने पहिल्यांदा जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष झाले होते. त्यावेळी पहिलीच टर्म होती.

तरीही त्यांना उपाध्यक्षपदाची संधी देण्यात आली होती. त्यावेळी त्यांचा लालटाकीचा बंगला ‌‘भलत्याच‌’ चर्चेने रंगला होता. यानंतर ते 2017 मध्ये पंचायत समिती लढले आणि पंचायत समिती सभापती पदाची स्वप्ने पाहू लागले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नाही. गेल्या काही वर्षात बाबासाहेब भोस हे नागवडेंचे मार्गदर्शक म्हणून वावरताना दिसत असले तरी यावेळी त्यांच्याही मनात आमदारकी दिसत आहे. साजन पाचपुते यांच्या रुपाने पाचपुतेंच्याच घरात बंडाचा झेंडा बाहेर आलाय. संजय राऊत यांनी त्यांना शब्द दिल्याचं सांगितलं जात आहे.

राहुल जगताप हे कारखाना अडचणीत असल्याने लढणार की नाही याबाबत तर्कवितर्क लढविले जात असताना शरद पवारांनी त्यांना संकेत दिल्याचे मानले जाते. तर दुसरीकडे त्याच शरद पवार यांनी घनश्याम शेलार यांना शब्द दिल्याची चर्चा देखील झडत आहे. राहुल जगताप आणि घनश्याम शेलार या दोघांमध्ये सारं काही अगदी ठरवून चाललं तर नाही ना असा प्रश्न श्रीगोंदेकरांमध्ये चर्चेत आहे. मागच्या निवडणुकीत घनश्याम शेलार यांच्यासाठी राहुल जगताप तणमनधनाने सक्रिय राहिले. आता त्याची परतफेड म्हणून घनश्याम शेलार हे राहुल जगताप यांच्यासोबत दिसल्यास आश्चर्य वाटू नये.

शेलार- जगताप ही जोडगीळी चर्चेत असताना दुसरीकडे राजेंद्र नागवडे, अण्णा शेलार, साजन पाचपुते ही दुसरी टीम चर्चेत आहे. या तिघांचाही काष्टीतील नागवडेंचा पंप हे बैठकीचं ठिकाण सध्या चर्चेत आहे. राहुल जगताप यांना उमेदवारी नको, असं अण्णासाहेब शेलार हे शरद पवारांना भेटून सांगून आल्याचीही चर्चा आहे. नागवडेंना लढायचं आहे. मात्र, त्यांना राहुल जगताप समोर नको आहे. त्यासाठी नागवडेंकडून साजनला रसद पुरवली जात असल्याची चर्चा आहे.

राहुल जगताप यांच्या उमेदवारीस विरोध करण्यासाठी शरद पवारांना भेटण्यास गेलेल्या शिष्टमंडळात बेलवंडीचे सरपंच ऋषीकेश शेलार, अनिल ठवाळ हेही होतेच. यानंतर दिपक नागवडे हे पवारांना भेटले आणि ही जागा काँग्रेसला सोडण्याची मागणी करून आले. याशिवाय वेळ आली तर तुतारी हाती घेण्याची तयारीही त्यांनी पवारांना दाखवलीय! काँग्रेस- भाजपा- काँग्रेस आणि शेवटी राष्ट्रवादी अजित पवार गट असा प्रवास केल्यानंतर राजेंद्र नागवडे हे पुन्हा बाळासाहेब थोरातांच्या पाया पडले. त्यांच्याकडे उमेदवारीची त्यांनी मागणी केल्याचं समजतंय! तसं पाहिलं तर नागवडे कुटुंबाचा बाळासाहेब थोरातांशी जुनाच घरोबा.

राजेंद्र नावगडे हे स्वत: काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि पत्नी अनुराधा या महिला जिल्हाध्यक्ष! राज्यात असे पद असणारा एकमेव जिल्हा आणि कुटुंब! मात्र, असं असताना याच नागवडेंनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर थोरातांची साथ सोडली आणि अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले. त्यात स्वार्थ होता तो कारखान्याला आर्थिक मदतीचा आणि परभणी येथे घेतलेल्या साखर कारखान्याचा जीएसटी आणि अन्य टॅक्स माफ करून घेण्याचा. विकत घेतलेले हेच खासगी साखर कारखाने आता विकायचे आणि निवडणूक करायची असा चंग राजूदादाने बांधला असल्याची चर्चा आहे.

गरीबाघरचा उमेदवार अशी गुगली टाकत रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेल्या घनश्याम अण्णांनी श्रीगोंद्यातील जागा विकण्याची तयारी चालवली असल्याचं समजतंय. जिल्हा बँकेची मदत देण्याचा आणि नगर तालुक्यात दोन गटातून मदत देण्याचा शब्द राहुल जगताप यांनी शिवाजीराव कर्डिलेंकडून घेतल्याची चर्चा नवीन नाही. या साऱ्या गडबडीत मुंबईत ठाण मांडून बसलेत ते साजन पाचपुते आणि दिपक नागवडे! कोणाला यश येते ते आता काही दिवसात समजेलच!

मी- बाप्पा, इतका सारा होमवर्क केला कधी तू? आणि हो…. बबनराव पाचपुतेंच्या उमेदवारीचं काय रे?

श्रीगणेशा- देवाभाऊने पाचपुतेंच्या कुटुंबातच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याचं समोर येत आहे. मात्र, असं असलं तरी पाचपुतेंच्या घरात कोण हे अद्याप ठरलेलं दिसत नाही. जिल्हा परिषदेच्या गट निहाय त्यांच्या बैठका झाल्याचं कळतंय. घरातच उमेदवारी लागेलच अशी मागणी या बैठकीतून पुढे आलीय. स्वत: बबनदादा दहा- अकरा तास या बैठकीत ठाण मांडून होते. एक मात्र खरं आहे की, या साऱ्या घडामोडीत पाचपुतेंच्या कुटुंबात नक्की काय चाललंय हे जाहीरपणे समोर यायला तयार नाही. त्यांच्या विरोधकांनी उमेदवार मीच अशी भूमिका घेत मतदारसंघ पिंजून काढलाय! बैठकांचा सपाटा लावलाय! या मतदारसंघात पाचपुते यांच्या विरोधात राहुल जगताप, सौ. अनुराधा नागवडे, घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार हे उमेदवारीचे प्रमुख दावेदार असून या चौघांनीही कोणत्याही परिस्थितीत लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. काही दिवसात हे सारं स्पष्ट होईल. मात्र, पाचपुतेंच्या विरोधात असणारी कथीतरित्या बोलली जाणारी नाराजी पदरात पाडून घेण्यात कोणाकोणाला कसं यश येते यावर बरंच काही अवलंबून असणार आहे. (तूर्तास पाचपुतेंच्या काष्टीत जाऊन येतो आणि तुझ्याशी पुन्हा बोलतो, असं म्हणत बाप्पाने काष्टीकडे प्रयाण केलं आणि मी नगरकडे!)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माझे सर्वस्व व नेतृत्व विखे कुटुंब : पै. युवराज पठारे

माझे सर्वस्व व नेतृत्व विखे कुटुंब : पै. युवराज पठारे काशिनाथ दाते यांना पारनेर शहरातून...

विखे पाटलांचा थोरातांवर हल्लाबोल ; काय म्हणाले पहा…

संगमनेर / नगर सह्याद्री अनेक वर्षापासून मंत्रिपद असतानाही आपण काही करू शकलो नाही याचे शल्‍य...

केंद्रीयमंत्री गडकरींचे पुन्हा एकदा बेधडक वक्तव्य; नेमकं काय म्हणाले पहा…

मुंबई / नगर सह्याद्री - भाजपचा विस्तार झपाट्याने होत आहे. पीक वाढले की त्यासोबत रोगही...

शरद पवारांचा सरकारला ”दे धक्का”; मविआत पवार निर्याणक भूमिकेत?, पवारांच्या डोक्यात नेमकं काय…

मुंबई / नगर सह्याद्री लोकसभा निवडणुकीत भावनिक आणि मुद्द्यांचे राजकारण महाविकास आघाडीला फायद्याचे ठरलं...