जामखेड । नगर सहयाद्री:-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चोंडी गावाचा देशातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा यासाठी विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी कंबर कसली आहे. श्री क्षेत्र चोंडी हे गाव राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी ला जोडले जावे यासाठी सभापती प्रा राम शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे महिनाभरापुर्वी मागणी केली होती.
त्यानुसार नितीन गडकरी यांनी शिंदे यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत चोंडी – गिरवली- कवडगाव – अरणगाव या १२ किलोमीटर रस्त्यासाठी केंद्रीय मार्ग निधीतून १० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. सदर निधी मंजुर झाल्यामुळे चोंडी गाव आता राष्ट्रीय महामार्गाशी जोडले जाणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांचे जीवन आणि त्यांच्या कार्याचे सर्व पैलू देशवासियांना एकाच ठिकाणी पाहता व अनुभवता यावेत यासाठी श्री क्षेत्र चोंडी विकासाचा सर्वसमावेशक असा बृहत विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. चोंडी हे देशातील प्रमुख पर्यटनस्थळ व्हावे, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. चोंडीला जोडणारे सर्व रस्ते पक्के केले जात आहे.
चोंडीला राष्ट्रीय महामार्गाला जोडले जात आहे. चोंडी गिरवली ते अरणगाव हा राष्ट्रीय महामार्ग ५४८ (डी) ला जोडणारा रस्ता खराब झाला होता. सदर रस्त्याला केंद्रीय मार्ग निधीतून निधी उपलब्ध व्हावा यासाठी विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागील महिन्यात निधीची मागणी केली होती.
केंद्रीय नितीन गडकरी यांनी प्रा राम शिंदे यांच्या मागणीची तातडीने दखल घेत चोंडी गिरवली कवडगाव अरणगाव या १२ किलोमीटर रस्त्यासाठी केंद्रीय मार्ग निधीतून १० कोटी रूपयांचा भरघोस निधी मंजूर केला आहे. या निधीतून चोंडी ते अरणगाव हा रस्ता आता पक्का होणार आहे. पर्यटकांना राष्ट्रीय महामार्ग ५४८ (डी) मार्गे चोंडीला सहजपणे पोहचणे शक्य होणार आहे. सदर रस्त्याला निधी मंजुर झाल्यामुळे चोंडी, गिरवली, कवडगाव या भागातील शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांना दर्जेदार रस्त्याची सुविधा मिळणार असल्याने या भागातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.