पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यात स्व. वसंतराव झावरे यांनी विचारांची लढाई केली. कोणापुढेही ते नतमस्तक झाले नाही. विचारांची लढाई विचारांनी लढायची असते आणि कामे मार्गी लावायची असतात ही परंपरा स्व. वसंतराव झावरे, नंदकुमार झावरे, विजय औटी यांनी घालून दिली. आज तालुक्यात उलटी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात नव्या समिकरणांना जन्म घालावा लागेल आणि अपप्रवृत्तींचा बंदोबस्त करावा लागणार आहे. त्यासाठी सुजित झावरे यांनी दोन पावले मागे टाकली तर त्यांना नक्कीच ताकद देऊ आणि नव्या समिकरणांना जन्म घालताना तालुक्याचे नेतृत्व सुजित झावरे यांच्या हाती देऊ असा विश्वास खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.
माजी आमदार वसंतराव झावरे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने वासुंदे येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ह. भ. प. डॉ. विकासानंद महाराज मिसाळ यांच्यासह माजी आमदार विजय औटी, जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते, अशोकराव सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे, राणीताई लंके, वसंतराव चेडे, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, डॉ. भाऊसाहेब खिलारी, शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहोकले, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाबासाहेब खिलारी, माजी सभापती गणेश शेळके, अर्जुन भालेराव, शंकर नगरे, दिपक पवार आदी उपस्थित होते.
पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून गणेश शिंदे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यानंतर झालेल्या कार्यक्रमात खा. विखे पाटील बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी तालुक्यात वसंतराव झावरे पाटील यांनी उभ्या केलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेताला. मिसाळ महाराज यांच्या संतपंढरीसाठी निधी देतानाच हे क्षेत्र क वर्ग तिर्थक्षेत्र म्हणून जाहीर करण्याची मागणही झावरे यांनी केली. याशिवाय विखे पाटलांनी आमच्यावर ‘विश्वास’ ठेवावा अशी भूमिकाही त्यांनी घेतली.
दरम्यान, खा. विखे पाटील यांनी सुजित झावरे यांना ताकद देण्याचा आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली तालुक्यात सर्व निर्णय घेतले जातील अशी ग्वाही दिली. मात्र, हे सारे करण्याआधी सुजित झावरे यांनी त्यांच्यासोबत आत्ता दिसणारे रात्री भलतीकडेच असतात हेही तपासावे. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची यादी द्यावी. त्या यादीतील नावांचे वाचन करताना त्यातील कितीजण समोर चिटकलेत हे मी नावानीशी दाखवून देतो, त्यांना सुजित झावरे यांनी बाजूला करावे आणि तालुक्याचे नेतृत्व हाती घ्यावे असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.
नैतिकतेच्या मुद्यावर आ. लंके यांना काढला चिमटा!
दहा वर्षे वसंतराव झावरे आमदार राहिले. पुढे विजय औटी पंधरा वर्षे आमदार राहिले. मात्र, त्यांनी कधीही वासुंद्याच्या स्थानिक राजकारणात हस्तक्षेप केला नाही. या गावातील निर्णय वसंतराव झावरे हेच घेतील आणि हे त्यांचेच गाव आहे अशी भूमिका औटी यांनी शेवटपर्यंत घेतली. मात्र, तालुक्यात अलिकडच्या काळात याला फाटा देण्यात आला असून नैतिकता संपली असल्याकडे सुजित झावरे यांनी लक्ष वेधले. आ. लंके यांनी मध्यंतरी झावरे यांच्या ताब्यातील शिक्षण संस्थेत हस्तक्षेप करत विश्वस्त मंडळात राणी लंके यांचे नाव टाकले होते. सुजित झावरे यांच्या चिमट्याला ती पार्श्वभूमी होती.