अहिल्यानगर | नगर सह्याद्री”-
शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक तसेच गौरीघुमट ते पटवर्धन चौक परिसरात मैलायुक्त गाळाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
आनंदी बाजारात परिसरात भुयारी गटार व रस्ता काँक्रिटीकरण काम मंजूर आहे तसेच या कामाचे भूमिपूजन होऊन अनेक महिने उलटून गेले आहे. तरी देखील कामास सुरवात न केल्याने येथील नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पाऊस झाल्यानंतर सदर परिसरात नवीन भुयारी गटार नसल्याने मोठ्या प्रमाणात मैलायुक्त गाळ साचून दुर्गंधी पसरली आहे.
तसेच शहरातील गांधी मैदान परिसरातील मागील पन्नास वर्षाचा पावसाच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. पाऊस पडला की मंगल गेट परिसरापासून चितळे रोड, गांधी मैदान, पटवर्धन चौक, आनंदी बाजार, गाडगीळ पटांगण या परिसराला अक्षरशः नदीचे स्वरूप येत असते.
अनेक नागरिकांच्या घरामध्ये तसेच दुकानात पावसाचे पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असते. सदरचा कामासाठी निधीही उपलब्ध झालेला असून प्रारंभ करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून सदरचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी केली आहे.