जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‘ उत्पादन शुल्क’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या पिंजऱ्यात
अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून दुकानात काम करणाऱ्या इसमानेच दुकान ताब्यात घेण्याचा धक्कादायक प्रकार कोतूळ (अकोले) येथे उघडकीस आला आहे. विश्वास संपादन करत भागीदारी करारनामा केल्यानंतर त्या करारनाम्यानुसार मुळ मालकाला कोणतीही रक्कम न देता सदर दुकान ताब्यात घेऊन मुळ मालकाला त्या दुकानात येण्यास मज्जाव केला जात आहे.
उत्पादन शुल्कचे संगमनरेमधील अधिकारी आणि स्थानिक पोलिस यांना हाताशी धरून मुळ मालकाला आत्महत्येस प्रवृत्त केले जात असून उत्पादन शुल्क विभागाच्या संगमनेर येथील निरीक्षकासह जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संबंधितांवर तसेच बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या शिवाजी तुकाराम देशमुख (कोतूळ) याच्यावर तातडीने गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी नवनाथ भाऊसाहेब डोंगरे हे त्यांच्या कुटुंबियांसह सोमवार, दि. 9 डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, पांगरी (अकोले) येथील स्वातंत्र्यसैनिकाच्या कुटुंबातील नवनाथ भाऊसाहेब डोंगरे यांचे कोतूळ येथे देशी दारुचे दुकान आहे. सदर दुकानात कामगार म्हणून शिवाजी देशमुख कामाला होता. त्याने डोंगरे यांच्या कुटुंबाचा विश्वास संपादन केल्यानंतर गावातील काही गुंडांना हाताशी धरत ोंगरे यांना त्रास द्यायला सुरुवात केली. स्थानिक असल्याने तोच ही प्रकरणे मिटवायचा. त्यामुळे कोणताही त्रास नको म्हणून डोंगरे यांनी जाधव याच्यासोबत भागीदारी करारनामा केला. भागीदार म्हणून आल्यानंतर त्याने लागलीच काही महिन्यातच सदर दुकानाचा ताबा घेतला.
शिवाजी तुकाराम देशमुख याने डोंगरे यांच्याशी भागीदारी करारपत्र केले असले तरी सदर भागीदारीपोटी कुठल्याही प्रकारचे देणेघेणे न होता, आर्थिक व्यवहार झालेला नाही. सदरचे भागीदारी करारपत्र करताना नवनाथ भाऊसाहेब डोंगरे हा अज्ञान (वय 17 वर्षे) होता. त्याला आर्थिक व्यवहार समजत नव्हता. शिवाजी देशमुख यांनी सदर परिस्थितीचा गैरफायदा घेवून गोडीगुलाबीने पैशाचे आमिष दाखवून वेळोवेळी खोटेनाटे सांगितले. तसेच तुझ्या घरच्या काहीही अडचणी असल्यास मी सोडवतो असे पोकळ आश्वासन देत राहिला.
तब्बल नऊ वर्षे जाधव याने डोंगरे यांना कोणतीही रक्कम दिली नाही. नऊ वर्षे झाली तरीही तो जुमानत नसल्याचे लक्षात आल्यानंतर डोंगरे यांनी न्याय मिळावा यासाठी अनेकदा पत्रव्यवहार केला असतानाही त्यास अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही असा आरोप करण्यात आला आहे. देशमुख याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसह हे दुकान मुळ मालक म्हणून आपल्या ताब्यात मिळावे या मागणीसाठी डोंगरे हे कुटुंबियांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार, दि. 9 डिसेंबरपासून उपोषणास बसणार आहेत.
भाडेकरू सारखा भागीदार म्हणून आला आणि ताबा मारला!
डोंगरे यांच्याकडे कामाला असताना विश्वास संपादन करत भागीदारी करारनामा करत जाधव याने दुकानात शिरकाव केला. मात्र, त्या करारनाम्यानुसार डोंगरे यांना जाधव याने एक रुपया देखील दिलेला नाही. कोणतीही रक्कम देत नसल्याने दुकानात येण्याचा प्रयत्न करणाऱ्या डोंगरे यांना जाधव याने अनेकदा मारहाण केली तसेच दुकानाशी तुमचा संबंध नाही, पुन्हा आलात तर जिवे मारुन टाकू अशी धमकी दिल्याचे डोंगरे यांचे म्हणणे आहे. भाडेकरुने घरच ताब्यात घेण्यासारखा हा प्रकार असून न्याय मिळण्याची मागणी डोंगरे यांनी केली आहे.
नगरच्या ‘उत्पादन शुल्क’ कार्यालयात तोडपाणी करणारा अधिकारी कोण?
भागीदारी करारनाम्यानुसार कोणत्याही प्रकारची पूर्तता न करता त्याच भागीदारी करारनाम्याचा आधार घेत स्वत: मालक असल्याचे भासविणाऱ्या शिवाजी देशमुख याच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. देशमुख याने नगरच्या कार्यालयात एका वरिष्ठ अधिकाऱ्याला काही ‘पेट्या’ दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. लाखो रुपयांचा मलिदा मिळाला असल्यानेच देशमुख याच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप डोंगरे यांनी केला आहे. लाखो रुपयांच्या पेट्या घेणारा अधिकारी कोण असा प्रश्न आता यानिमित्ताने चर्चेत आला आहे.
भागीदारी नोंदीबाबत अधिकार नसताना संगमनेर, नगरच्या अधिकाऱ्यांनी वापरला अधिकार?
परवाना दुसऱ्याच्या नावावर करणे अथवा भागीदाराचे नाव परवान्यात दाखल करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. या विभागाचे आयुक्त शासनाच्या परवानगीने असे करु शकत असताना शिवाजी देशमुख याचे नाव परवान्यात टाकण्यात आले. नाव टाकण्याचा अधिकार नसताना तो वापरलाच कसा केला गेला असा प्रश्न आहे. संगमनेर येथील निरीक्षक सुनील सहस्त्रबुद्धे यांच्यासह नगरचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्याशी या अनुषंगाने संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. या अनुषंगाने नगरच्या कार्यालयात मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे समोर येत आहे.