नाशिक / नगर सह्याद्री –
नाशिकमध्ये नवऱ्याने पत्नी आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आलीय. जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सोनारी गावात ही घटना घडली असून या घटनेनं नाशिक हादरलं आहे. सध्या पत्नी आणि सासूला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तर या प्रकरणी पोलिसांता गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सध्या नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या आहेत स्नेहल शिंदे आणि अनिता शिंदे या मायलेकी.. यांची ही अवस्था केलीय, स्नेहल शिंदे यांचा नवरा केदार हंडोरे याने.. मागील वर्षी स्नेहल शिंदे आणि केदार यांनी प्रेमविवाह केला होता. मात्र त्यानंतर दोघांमध्ये झालेल्या वादातून मागील काही दिवसांपासून पत्नी स्नेहल माहेरी राहत होती. याचं रागातून पती केदार रविवारी मध्यरात्री स्नेहलच्या घरी पोहचला. तिथं पुन्हा स्नेहल आणि केदारमध्ये वाद झाले.
या वादा नंतर चिडलेल्या केदारने ज्वलनशील पदार्थ टाकून बायको आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्याने स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून स्वतःला देखील पेटवून घेतलं. यामध्ये १९ वर्षीय पत्नी स्नेहल ५० टक्के, सासू अनिता शिंदे ६५ टक्के भाजल्या असून पती केदार देखील ६५ टक्के भाजल्या आहेत. सध्या स्नेहल आणि अनिता शिंदेंवर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर केदारला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.
ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत संपूर्ण घटनेचा तपास आणि पंचनामा केला असून केदारने कोणत्या ज्वलनशील पदार्थाने बायको आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, यासाठी फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं असून सिन्नर पोलिस ठाण्यात यासंदर्भातील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
या घटनेतील पीडित पत्नी आणि तिचा पती यांचे आधीपासूनच नातेसंबंध असल्याची देखील माहिती आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. त्यातच बायको माहेरी निघून गेल्याच्या रागातून नवऱ्याने चक्क बायको आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडालीय. पती पत्नीतील वाद हे सामंजस्यानं सुटायला हवेत, वेळप्रसंगी समुपदेशनाची देखील मदत घ्यायला हवी, हे या घटनेवरून स्पष्ट होतंय.