सरपंचाने केली पोषण आहाराची पोलखोल / चिचोंडी पाटील, आठवडमधील प्रकार; सीईओंकडे तक्रार
अहमदनगर / नगर सह्याद्री –
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील व आठवड या गावांमध्ये एकूण 11 अंगणवाडी केंद्र असून या अंगणवाडी केंद्रामध्ये निकृष्ट दर्जाचे पोषण आहार वाटप सुरु असून याबाबत वारंवार तक्रारी करून देखील कुठलीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नेमके या निकृष्ट आहार वाटपातून कोणाचे हिट साधत आहे असे सवाल येथील ग्रामस्थ आता विचारू लागले आहेत.
याबाबत चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीचे सरपंच शरद पवार यांच्याकडे पालकांसह अंगणवाडी सेविकांनी लेखी व तोंडी पद्धतीने तक्रारी केल्याने आज सरपंच पवार यांनी अंगणवाडी केंद्रांमध्ये जाऊन शहनिशा केली असता यात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या असून लाभार्थी बालकांना शासनातर्फे दिला जाणारा टी.एच.आर आहाराची वैधता संपलेली असताना देखील त्याचे वाटप येथील कंत्राटदाराकडून केले गेले आहे. या टी.एच.आर आहारात अनेक त्रुटी आढळून आल्या असून हा आहार पुड्यांमधील पोषण आहार हा एकात्मीक बालविकास योजनेतील मार्गदर्शक तत्वांनुसार नाही. त्यात प्रोटीन, लोह, कॅल्शियम, थाईमिन, साखर, शेंगदाणे असे अनेक घटकांचाही समावेश नसल्याचे प्रथम दर्शनी आढळून आले आहे.
संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात व महाराष्ट्रात फेडरेशनचा आहार वाटप असताना फक्त या गावांतच खाजगी कंत्राटदाराकडून आहाराचे वाटप का ? असा सवाल उपस्थित होत आहे. अशिक्षित तसेच अज्ञानी पालकांनी हा आहार पाल्यांना खाऊ घातल्यास मोठ्या प्रमाणात विषबाधा होऊ शकते अशी दाट शक्यता दिसते. अनेक लाभार्थी बालकांना हा आहार खाल्यानंतर उलट्या, जुलाब, मळमळ झाल्याचे अनेकांनी ग्रामपंचायतीकडे लेखी कळविले आहे.
तरी सदर गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन निकृष्ट आहाराचे वाटप तात्काळ थांबवून वाटप केलेला आहार लाभार्थ्यांकडून तात्काळ परत मागवावा. सदर पोषण आहाराचे अन्न व औषध प्रशानामार्फत परीक्षण व्हावे, सदर बोगस, बनावट महिला बचत गटाचे टेंडर तात्काळ रद्द करावे त्याची आर्थिक बिले / देयके तात्काळ थांबवावीत, यापूर्वीची शासनाची सर्व देयकांची रक्कम व्याजासह वसूल करावी. तसेच या सर्व गोष्टींची गांभिर्याने दखल घेऊन दोषींवर तात्काळ कारवाई काण्याची मागणी यावेळी सरपंच शरद पवार यांनी केली.