अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
वर आणि वधूचे लग्न होऊन वधू सासरी नांदायला आली. रितीरिवाजाप्रमाणे सत्यनारायण पूजा घातली जाते. या पूजेच्या कार्यक्रमात एक महिला पाहुणी आली होती. तिने वधूला पाहताच या वधूने तर मागच्या वर्षी माझ्या मुलाशी लग्न केले होते. लग्न होताच ही वधू आमची आर्थिक फसवणूक करून पळून गेली होती. असे म्हणत त्या बनावट वधूचे बिंग फोडले.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील एका गावातील मुलगा पुणे येथील खासगी कंपनीत कामास आहे. मुलाचे लग्न करायचे असल्याने घरची मंडळी मुलगी पाहत होते. त्याच दरम्यान चोराचीवाडी येथील लग्न जमविणाऱ्या मध्यस्थीची भेट झाली. त्या मध्यस्थीने विवाह जमवून देतो; पण लग्नासाठी दोन लाख ६० हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. विवाह निश्चित झाल्यानंतर ४० हजार व लग्न झाल्यानंतर उर्वरित रक्कम देण्याचे ठरले. वधू-वराचे लग्न आळंदी येथे पार पडले.
रितीरिवाजाप्रमाणे सत्यनारायण पूजेचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमास आजूबाजूच्या नातेवाइकांना निमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमास एक महिला नातेवाईकही आली होती. पूजेच्या दरम्यान त्या महिलेने वधूला पाहताच तिला धक्काच बसला. तिने ही माहिती नातेवाइकांना सांगितली. ज्या वधूशी लग्न झाले आहे त्याच वधूचे मागील वर्षी माझ्या मुलाशी लग्न झाले होते.
आमच्याकडून दोन लाख रुपये घेऊन या वधूने पलायन केले होते. हे संभाषण त्या बनावट वधूने ऐकले. लागलीच मध्यस्थी अन् त्या बनावट वधूने तेथून धूम ठोकली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वराकडील मंडळीने लग्न जमविणाऱ्या मध्यस्थीकडे दिलेले पैसे परत मिळावे यासाठी मागणी केली. मात्र, त्या मध्यस्थीने पैसे देण्यास नकार दिला. लग्नही गेले अन् पैसेही अशी अवस्था त्या वरासह नातेवाइकांची झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखले करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.