पुणे । नगर सहयाद्री-
कल्याणी नगर अपघात प्रकरणी एक मोठी माहिती समोर आली आहे. आरटीओने सोमवारी अपघातग्रस्त कारची तपासणी पूर्ण केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तपासणीत नवी माहिती उजेडात आली आहे. तपासणी दरम्यान कारमध्ये कुठलाही बिघाड आढळून आला नाही. याचाच अर्थ ज्यावेळी अपघात झाला, त्यावेळी कारमध्ये कुठलाही बिघाड झालेला नव्हती.
आरटीओसोबतच पोर्शे कंपनीच्या इंजिनिअरच्या पथकानेही कारची तपासणी केली आहे. या तपासणीतही कारमध्ये कुठलाही बिघाड आढळून आला नाही. याबाबतचा अंतिम अहवाल आता दोन ते तीन दिवसांत पोलिसांकडे सादर केला जाणार आहे.दरम्यान, पोर्शे कारच्या तपासणीतून अपघाताचे आणखी नवीन धागेदोरे पोलिसांच्या हाती लागणार आहे.
कारच्या कॅमेऱ्याच्या चित्रीकरणातून अपघात कसा झाला, हेही स्पष्ट होणार आहे. इलेक्ट्रॉनिक डेटासह पुढील आणि मागील बाजूच्या कॅमेऱ्यातील चित्रीकरण ताब्यात घेण्यात आलं आहे.चालकाने कारचा ब्रेक किती वेळा दाबला? अपघातावेळी मोटारीचा वेग किती होता? किती वेळा ॲक्सिलेटर देण्यात आला? या बाबी देखील स्पष्ट होणार आहे.