पारनेर । नगर सहयाद्री:-
भाळवणी (ता. पारनेर ) येथील विजयागंगा स्कूल ऑफ नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थिनीने एका तरुणाच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मयत विद्यार्थिनीचे नाव रोशनी अरुण तेलगुटे (वय २१, रा. गाडगेनगर, मुर्तिजापूर, जि. अकोला) असे आहे.
याप्रकारणी पारनेर पोलिस ठाण्यात रोशनीचे वडील अरुण गंगाराम तेलगुट (रा. गाडगेनगर, मुर्तिजापूर, जि. अकोला) यांनी फिर्यादी दिली आहे. त्यानुसार हर्षदीप ताटके (रा. चिखली, ता. मुर्तिजापूर, जि. अकोला) याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्षदीप ताटके याच्याकडून तिला दहावीपासूनच त्रास दिला जात होता. त्यावेळीही रोशनीच्या वडिलांनी संबंधिताच्या पालकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हर्षदीप ताटके रोशनीला सतत फोन करून त्रास देत होता. तिच्याकडून पैशांची मागणी करत होता. फोन उचलला नाही, तर ती कुठे बोलते, कोणाशी बोलते यावरून संशय घेत तिला धमकावले जात होते. त्यामुळे ती प्रचंड तणावात होती आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करत होती.
घटनेच्या दिवशी रोशनीने फोन करून १५ हजार रुपये मागितले होते. त्याच रात्री कॉलेज व्यवस्थापनाकडून तुमच्या मुलीने आत्महत्या केली असल्याचा फोन आला असल्याचे वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात १ सप्टेंबर रोजी रात्री आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पारनेर पोलिस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.