पुणे / नगर सह्याद्री : बारामतीमध्ये 2 मार्च रोजी नमो रोजगार मेळाव्याचे आयोजण करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शनिवारी बारामतीत येणार आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बारामतीत एवढा मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.
दरम्यान या कार्यक्रमास शरद पवार यांना मात्र निमंत्रण देण्यात आलेले नाही. परंतु आता एक मोठी माहिती समोर येत आहे. बारामतीत येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शरद पवारांनी फोन करून त्यांच्या घरी जेवणाचे निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विनंतीवरून येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवारांचे निमंत्रण स्वीकारणार का हे पाहावं लागेल.
बारामतीत येत्या शनिवारी शासकीय कार्यक्रम असतानाही, राज्यसभेचे खासदार असणाऱ्या शरद पवारांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलं नाही. आता शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या घरी जेवणाचे आमंत्रण दिलं असताना ते आमंत्रण स्वीकारलं जाईल का हे पाहावं लागेल.
बारामतीला जेव्हा कुणीही येतं त्यावेळी शरद पवार हे आवर्जून त्यांना घरी बोलावतात, अथिती देवो भवः ही आमची संस्कृती असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटल असून मुख्यमंत्री जर बारामतीला येत असतील तर त्यांना बोलावणे ही आमची संस्कृती असल्याचंही त्या म्हणाल्या. बारामती रोजगार मेळाव्यास खासदार अमोल कोल्हे, वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे याना आमंत्रण आहे. परंतु राज्यसभेचे खासदार असणाऱ्या शरद पवारांचे नाव मात्र वगळण्यात आल्याने त्यावर राजकीय चर्चा सुरू आहे.