जालना / नगर सह्याद्री –
शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केले. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून ७५ टक्क्यांपर्यंत वाढवावी असे वक्तव्य शरद पवार यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पहिली प्रतिकिया दिली आहे. ‘लोकांना वेड्यात जमा करण्याचे काम ते करत आहेत. आधी बोलले असते तर मार्ग तरी लागला असता.’, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
मनोज जरांगे यांनी सांगितले की, ‘मराठा समाजासाठी कोणी काय मागणी केली, काय नाही केली यापेक्षा आधी मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत ओबीसी आरक्षणामध्ये घ्यावे. त्यानंतर तुम्हाला मर्यादा १०० टक्के का १५० टक्के वाढवायची आहे तेवढी वाढवा. त्याच्याशी आम्हाला घेणं-देणं नाही. मराठा समाज हा ओबीसी आरक्षात २७ टक्क्यांच्या आत आगोदर आला असेल. मराठ्यांना आधी ओबीसी आरक्षणामध्ये घेतले पाहिजे त्यानंतर मर्यादा वाढवली पाहिजे. ही सर्व बहाणेबाजी आहे. कुठे तरी समाजाला फसवायचे, त्याची दिशाभूल करायची, मराठ्यांना मार्ग वेगळा दाखवायचा, सहानुभूती दाखवायची. पण हा प्रकार असा नाही. तुम्हाला आधी आरक्षण द्यावे लागेल. त्यानंतर मर्यादा वाढवायची की नाही हे तुमचं तुम्ही नंतर ठरवा.’
जरांगे पाटील यांनी पुढे सांगितले की, ‘उगाच आशेला नका लावू लोकांना. आम्ही मर्यादा वाढवतोय आणि आरक्षणात घालतोय ही आशा आम्हाला नकोय. आधी आम्हाला आरक्षणात घाला. चॉकलेट दाखवणे बंद करा. सत्ताधारी असो किंवा महाविकास आघाडी सर्वच मराठ्यांकडून फायदा करून घेत आहेत. आधी आम्हाला ५० टक्क्यांच्या आतमध्ये घ्या. पण नादी लावू नका. निवडणुका होईपर्यंत किंवा मराठ्यांचा फायदा करून घेईपर्यंत विरोधी पक्षाने पण आणि सत्ताधाऱ्यांनी हा नवीन डाव आणलेला दिसतोय.’
तसंच, ‘जनतेला खूश करण्यासाठी हे सर्व शब्द वापरू नका. ५० टक्क्यांची मर्यादा वाढवा आणि मराठा समाजाला आरक्षणात घ्या नंतर मर्यादा वाढवू. यामुळे मराठा समाज खूश होणार नाही. तुम्ही जनतेला वेड्यात जमा करण्याचे काम करत आहे. इथून मागे बैठका झाल्या तेव्हा विषय काढायचे ना. आता निवडणुकीच्या तोंडावर विषय काढून लोकांना काय नादी लावताय. महायुती असो महाविकास आघाडी असो हे दोन्ही एकच आहे. हा त्यांचा डाव आहेत. ते फक्त लोकांना वेड्यात काढतात. आता बोलले मर्यादा वाढव्याचा मुद्दा. ५० टक्क्यांच्या आत मराठ्यांना घ्या असे आधी म्हणाले असते तर मार्ग लागला असता. आता आचारसंहिता लागू होईल. महाविकास आघाडी आणि महायुती यांना मराठा समाजाला खेळवत ठेवायचे आहे.’, असं म्हणत जरांगे पाटील यांनी पवारांवर टीका केली.