मुंबई / नगर सह्याद्री : आगामी लोकसभा निवडणुकीनिमित्त राज्यात राजकीय डावपेचांचा उधाण आले आहे. अनेक दिग्गज एकमेकांच्या भेटी घेत आहेत. त्यात नेवासा मतदारसंघातील अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. गडाख हे सकाळी देवगिरी बंगल्यावर पोहचले त्यावेळी माध्यमांच्या कॅमेऱ्यात त्यांच्या गाड्यांचा ताफा कैद झाला. अजित पवार आणि शंकरराव गडाख यांच्या भेटीमुळे नगर जिल्ह्यात काही वेगळी समीकरणे तयार होतायेत का अशी चर्चा सुरू झाली आहे.
या भेटीनंतर शंकरराव गडाख यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी अजित पवारांना दुसऱ्यांदा भेटायला आलो आहे. अजित पवारांनी दिलीप वळसे पाटलांना भेटायला सांगितले होते. आज वळसे पाटील देवगिरी बंगल्यावर होते. त्यामुळे मी इथं आलो. मतदारसंघातले जे विकासाचे प्रश्न आहेत त्याबाबत ही भेट होती. त्यात राजकीय चर्चा झाली नाही. मी कामाकरता अजितदादांना, देवेंद्र फडणवीस यांना भेटत असतो. कारण लोकांचे काम करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं काम असते. त्याचा गैर अर्थ कुणीही काढू नये असं त्यांनी सांगितले.
तसेच आमच्या भेटीत काही राजकीय चर्चा झाली नाही. प्रत्येकजण स्वतंत्र निर्णय घेण्यास सक्षम असतो. लंके यांनी निर्णय घेतलेला आहे. परंतु आमच्या भेटीत तशी काही चर्चा झाली नाही. आमचा मतदारसंघ नेवासा हा शिर्डी मतदारसंघात येतो. हा मतदारसंघ राखीव असल्याने तिथे उभं राहण्याचा काही प्रश्न नाही असंही आमदार शंकरराव गडाख यांनी स्पष्ट केले.