पारनेर ।नगर सहयाद्री:-
पारनेर तालुक्यात दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र होत चालली आहे. सध्या तालुक्यातील 18 गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, यापैकी 11 गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत. उर्वरित सात गावांचे प्रस्ताव नुकतेच प्राप्त झाले असून, त्या गावांतील पाण्याच्या सध्याच्या परिस्थितीची पाहणी करून गरजेनुसार हे प्रस्तावही जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले जाणार आहेत.
सध्या तालुक्यात एकही टँकर सुरू नसला तरी, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच 18 गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. यापैकी बाभुळवाडे, मुंगशी, जामगाव, काताळवेढे, विरोली, कान्हूर पठार, पिंप्री पठार, वेसदरे, करंदी आणि सारोळा आडवाई या 11 गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहेत.
हे प्रस्ताव (दि. 7) रोजी मंजूर होण्याची शक्यता असून, (दि. 8) पासून या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय, हत्तलखिंडी, वडनेर हवेली, किन्ही, पळशी, पिंपळगाव तुर्क, म्हसोबा झाप आणि पिंपळगाव रोठे या सात गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव पारनेर पंचायत समितीकडे नव्याने प्राप्त झाले आहेत. या गावांतील पाण्याच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून गरज भासल्यास हे प्रस्तावही मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवले जाणार आहेत. तालुक्यातील बहुतांश गावांतील विहिरी आणि तलावांनी तळ गाठला असून, कूपनलिकाही कोरड्या पडू लागल्या आहेत.
टँकर भरण्यासाठी मांडओहळ धरण मुख्य स्रोत
पठार भागातील टँकर भरण्यासाठी मांडओहळ धरण हा मुख्य स्रोत वापरला जाणार आहे. मात्र, या धरणातील पाण्याची पातळीही खालावत चालली आहे. शेतकऱ्यांनी अनधिकृतपणे पाण्याचा उपसा केला नाही, तर हे पाणी किमान दोन ते अडीच महिने टँकर भरण्यासाठी पुरेल, असा अंदाज आहे. याशिवाय, कोहकडी आणि शिरापूर येथील उद्भवही गरजेनुसार टँकर भरण्यासाठी वापरले जाणार आहेत.
40 गावे, 320 वाड्यांना टंचाईचा धोका
यापूवच तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी पारनेर तालुक्यातील पाणीटंचाईचे अंदाजपत्रक जिल्हा परिषदेकडे सादर केले आहे. त्यात आगामी काळात सुमारे 40 गावे आणि 320 वाड्या-वस्त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासाठी अंदाजे 1 कोटी 30 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू
तालुक्यातील पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. टँकर मागणीचे प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी पाठवले जात आहेत. येणाऱ्या काळातही परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे गटविकास अधिकारी दयानंद पवार यांनी सांगितले.