Ashish Kapoor : मनोरंजन विश्वात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता आशिष कपूर याला एका महिलेवर कथित लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून पुण्यात अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता कपूर याने एका पार्टीदरम्यान बाथरूममध्ये तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.
पीडित महिला आणि आशिष कपूर यांची ओळख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर झाली होती. त्यानंतर, अभिनेत्री कपूरच्या एका मित्राच्या दिल्लीतल्या घरी झालेल्या पार्टीसाठी गेली होती. याच पार्टीदरम्यान कथित घटना घडल्याचे महिलेने सांगितले आहे.
महिलेच्या आरोपानुसार, पार्टीदरम्यान ती आणि आशिष कपूर बाथरूममध्ये गेले आणि तिथे कपूरने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी बाथरूममध्ये ते बराच वेळ राहिल्याने इतरांना संशय आला व त्यांनी दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडल्यानंतर वाद झाला असून, त्या वेळी कपूरच्या मित्राच्या पत्नीने पीडित महिलेला मारहाण केल्याचा आरोपही तिने केला आहे.
या प्रकरणी पीडित महिलेने ११ ऑगस्ट रोजी आशिष कपूर, त्याचा मित्र, मित्राची पत्नी आणि दोन अनोळखी पुरुषांविरोधात FIR दाखल केली होती. यानंतर १८ ऑगस्टला महिलेनं तपशीलवार माहिती देत कपूर आणि त्याच्या मित्रावर अत्याचाराचे आरोप लावले आहे. पोलिसांनी अभिनेता आशिष कपूरला बुधवारी पुण्यातून अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. सर्व आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणामुळे मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली आहे.