बीड / नगर सह्याद्री –
बीडमधील परळीत काल (१६ मे) शिवराज दिवटे या तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आली. लाठ्या, काठ्या आणि हत्यारांनी तरुणाला मारहाण झाल्याची माहिती समोर आली. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मारहाण प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी सात जणांना अटक केली असून जखमी शिवराजवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शिवराज दिवटेने त्याच्यासोबत काय घडले याची माहिती दिली. ‘मी माझ्या मित्रांसह अखंड हरिनाम सप्ताहाला गेलो होता. त्या ठिकाणी काही लोकांचे भांडण झाले होते. मला त्या संदर्भात काहीच माहिती नव्हती. त्यानंतर मी माझ्या गावी जाण्यासाठी निघालो. रस्त्यात आमच्या दुचाकीला चार ते पाच जणांनी अडवले आणि दुसऱ्या दुचाकीवर बसवून रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात घेऊन गेले’, असे शिवराज म्हणाला.
‘रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात नेल्यानंतर त्यांनी मला लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. मारहाण करताना ते याचा संतोष देशमुख पार्ट टू करु असे म्हणत होते. काही लोक माझ्या मदतीला आले. त्यांच्या तावडीतून मला सोडवले नसते, तर त्या पोरांनी मला जिवंत सोडले नसते. त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी’, असे म्हणत शिवराज दिवटेने घडलेला प्रसंग सांगितला.
शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे. हे लोक वाल्मीक कराडच्या गँगशी संबंधित असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवर अंजली दमानिया यांनी देखील भाष्य केले आहे. शिवराज दिवटेच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.