Maharashtra Crime: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या मुलीची गळा आवळून खून केला आहे. परभणीच्या पालम तालुक्यातील नाव्हा येथे २१ एप्रिल रोजी ही घटना घडली आहे. या घटनेला दहा दिवस उलटून गेल्यानंतर हत्येचे प्रकरण उजेडात आलं आहे.
इतर जातीच्या मुलाबरोबर विवाह का करतेस ? म्हणून परभणीत १९ वर्षीय मुलीचा जन्मदात्यानेच खून केला आहे. २१ एप्रिल रोजी ही घटना घडल्याचे सांगितले जातेय. त्यानंतर कोणालाही थांगपत्ता लागू न देता भावकीतील निवडक लोकांच्या उपस्थितीत मयत मुलीचे प्रेत रात्री जाळून पुरावा नष्ट करण्यात आला होता,मात्र पोलिसांना या घटनेची गुप्त माहिती प्राप्त झाल्याने हत्येचे प्रकरण उजेडात आले आहे.
पोलिसांनी याप्रकरणी आरोपी वडील बालासाहेब भीमराव बाबर, आई रुक्मिणीबाई बालासाहेब बाबर, गंगाधर योगाजी बाबर, राजेभाऊ रखमाजी बाबर, अशोक रुस्तुमराव बाबर, रुस्तुमराव दत्तराव अशोक बाबर आबासाहेब बाबर, अच्यूत बाबर, गोपाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गंगाखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
वर्षीय तरुणीचे १९ गावातीलच अन्य जातीतील मुलावर प्रेम होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मुलीने इतर जातीतील मुलासोबत लग्न करु नये, म्हणून तिच्यावर आई-वडिल दबाव टाकत होते. मात्र तरीही तिने त्याच मुलासोबत लग्न करण्याचा निर्धार केला होता. म्हणून पालकांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ती तिच्या निर्णयावर ठाम होती. २१ एप्रिलच्या रात्री पालकांनीच तिची हत्या करत गुपचुप तिचा मृतदेह जाळून टाकला.