नवी दिल्ली | वृत्तसंस्था
भारत – इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना रांचीमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी १९२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने विजय मिळवला. दरम्यान या विजयासह भारतीय संघाने कसोटी मालिकेत ३-१ ने विजयी आघाडी घेतली आहे.
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. सामन्याच्या तिसर्या दिवशी रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालने मिळून ४० धावा जोडल्या. रोहित शर्मा २४ तर यशस्वी जयस्वाल १६ धावांवर नाबाद परतला. चौथ्या दिवशी दोघांनी चांगली सुरुवात केली.
मात्र यशस्वी जयस्वालच्या रुपात भारतीय संघाला पहिला मोठा धक्का बसला. अर्धशतक झळकावल्यानंतर रोहितनेही पॅव्हेलियनची वाट धरली. त्यानंतर भारतीय डाव गडगडल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्मानंतर रजत पाटिदारही परतला. गिल आणि जडेजाने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. जडेजा बाद होताच सरफराज खानही खात न खोलता परतल्याने टीम इंडियावर दडपणही आले. मात्र उर्वरित खेळाडूंनी डाव सावरत विजय संपादन केला.