लाखोंच्या सोन्यासह रोकड लंपास
सुपा / नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यात दरोडेखोरांनी भरदिवसा धुमाकूळ घातला आहे. एका दिवसात रांजणगाव मशीद ,चिंचोली, राळेगण थेरपाळ या गावांमध्ये घरफोड्या करत लाखोंचाऐवज लंपास केला आहे. एरवी चोरटे रात्री फोड्या करीत मात्र आता भर दिवसा ही चोरटे घरफोडया करू लागले असून पोलिसांचा वचक कमी झाला आहे का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
अधिक माहिती अशी: पहिली घटना पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रांजणगाव मशीद गावच्या शिवारात रविवारी दि. १९ मे रोजी सकाळी ११.३० ते १२.४५ वाजण्याच्या दरम्यान संदीप दत्तात्रय मगर यांच्या बंद घरावर दरोडेखोरांनी डल्ला मारत कपाटात ठेवलेले अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि पंचवीस हजाराची रोकड लंपास केला.
तसेच दुसरी घटना पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राळेगण थेरपाळ गावच्या शिवारातील नारायण गंगाराम डोमे यांच्या बंद घरावर रविवारी दि. १९ मे रोजी दुपारी २ ते ५.३० वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी दरोडा टाकत कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोकड असा दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला तर तिसरी घरफोडीची घटना चिंचोली गावच्या शिवारात सकाळी ९ ते दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान घडली.
चिंचोली येथील अहिल्या विश्वनाथ पिंपळकर यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप दरोडेखोरांनी तोडून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोकड असा पाच लाख पन्नास हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. या तिन्ही घटना प्रकरणी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास पोलीस करत आहे.