नाशिक / नगर सह्याद्री : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पक्षाचा अठरावा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा केला. या त्याच्या कार्यक्रमात ते काय बोलतात किंवा कुणावर टीका करतात किंवा महायुतीमध्ये जाण्याबाबत चर्चा करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
या कायक्रमात बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. परंतु या कार्यक्रमात ते उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप यांचा उल्लेख मात्र त्यांनी केला नाही.
यावेळी त्यांचा सर्व फोकस ‘मनसे’चा कार्यकर्ता होता. या वेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबतच्या भूमिकेबाबत सस्पेन्स कायम ठेवला. राज ठाकरेंच्या भाषणात सद्यःस्थिती आणि विरोधकांचा खरपूस समाचार ठरलेला असतो किंबहुना त्यासाठीच त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या भाषणाकडे कान लावून बसलेले असतात. आजच्या वर्धापन दिनात राज ठाकरे यांनी सध्याचे फोडाफोडीच्या राजकारणावर कोरडे ओढले. या शिवाय त्यांनी शरद पवारांनाही लक्ष्य केले.
राज्यातील विविध पक्षांतील फाटाफूट आणि आजच्या राजकारणाचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. अनेक राजकीय पक्ष निघाले मात्र खऱ्या अर्थाने पक्ष म्हणता येईल असे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोनच पक्ष आहेत. यात कुणीही राजकारणातील नव्हता. या पक्षांतील कार्यकर्त्यांना राजकीय प्रतिष्ठा देण्याचे काम पक्षाने केले.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडून येणाऱ्या लोकांची मोळी बांधली. ते लोक त्या पक्षात नसते तरीही निवडून आलेच असते. आजही शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही गट वेगळे असले तरी, आतून एकच आहेत, अशी टीका करून ठाकरे यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले.