अमरावती / नगर सह्याद्री –
महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेवरुन विरोधकांनी सातत्याने सरकारवर टीका केली आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना महिन्याचे १५०० रुपये दिले जातात. सरकारकडून मतांसाठी ही लाच दिली जाते आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसंच उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रणिती शिंदे, नाना पटोले यांनीही आत्तापर्यंत अनेकदा या लाडकी बहीण योजनेवरुन महायुतीवर टीका केली आहे. आता राज ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना लाडकी बहीण योजनेवरुन टीका केली आहे.
राज ठाकरे काय म्हणाले?
अमरावतीत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं. “जानेवारीत पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे राहणार नाहीत’ असं राज ठाकरे म्हणाले.”राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर ते चुकीचं आहे. महिलांना अशा प्रकारे पैसे न देता राज्यात नवीन उद्योग आणा” असं म्हणत राज ठाकरेंनी या योजनेवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.
लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरेंचं पाच मुद्द्यांवर भाष्य
१) ऑक्टोबरचा पहिला हप्ता दिल्यानंतर जानेवारी महिन्यात पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे नसणार.
२) सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना तयार केल्या जात असतील तर त्याचा राज्यावर परिणाम होईल.
३) राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर हे चुकीचं आहे.
४) महिलांना अशा प्रकारे पैसे न देता राज्यात नवीन उद्योग आणले पाहिजे, रोजगार दिला पाहिजे.
५) समाजातील कोणताही घटक फुकट काही मागत नाही.
प्रफुल्ल पटेल यांची राज ठाकरेंवर टीका
राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर महायुतीमधल्या नेत्याने त्यांना प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे. ‘ ज्यांच्या पोटात दुखतं तेच अशी वक्तव्य करतात’ असं म्हणत महायुतीमधील अजित पवार गटातील नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज ठाकरेंवर टीका केली. आमच्या सर्व बहिणी आमचं स्वागत करत आहेत, असंही ते म्हणाले.