spot_img
अहमदनगरनगरमध्ये कोतकर-जगताप संघर्ष नव्या वळणावर!

नगरमध्ये कोतकर-जगताप संघर्ष नव्या वळणावर!

spot_img

राजकीय ताकद कोणामुळे कोणाला अन् कोणाला मोजावी लागली किंमत!
महापौर पदानंतर कोतकरांना मिळाल्या होत्या ९ तर जगतापांना १८ जागा

सारिपाठ । शिवाजी शिर्के –
विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील अशी चिन्हे आहेत. नगर शहर विधानसभा मतदारसंघात माजी राज्यमंत्री अनिलभैय्या राठोड यांच्या अकाल निधनानंतर आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात कोण असा प्रश्न सातत्याने चर्चेत राहिला. पंधरा- वीस दिवसांपूर्वीपर्यंत जगताप यांच्या विरोधातील उमेदवारांची लांबलचक यादी चर्चेत होती. मात्र, माजी महापौर संदीप कोतकर यांचे नाव चर्चेत आले आणि त्यांच्याकडून सोशल मिडियाच्या माध्यमातून नगरमध्ये निवडणुकीचे संकेत देण्यात आल्यानंतर चर्चेतील सार्‍यांचीच नावे मागे पडली. ज्यांची नावे चर्चेत होती, त्या सर्वांचाच राजकीय संघर्ष झाला तो भानुदास कोतकर यांच्यासोबत! पुढे हेच कोतकर जगताप- कर्डिले यांचे व्याही झाले! कोतकरांचे पाहुणे झाल्याने कर्डिलेंनाही त्याची किंमत मोजावी लागली आणि जगतापांना देखील!

पाहुणे झाले तरी या तीघांचेही वेगवेगळे राजकीय पक्ष राहिलेत! संदीप आणि संग्राम हे साडू असले तरी दोघांमध्ये फारसे सख्य नव्हते आणि नाही! आता येणार्‍या निवडणुकीत ते पहिल्यांदाच आमने- सामने येण्याची शक्यता निर्माण झाली असून या दोन कुटुंबातील संघर्ष आता नव्या वळणावर आल्याचे मानले जाते. ताकदवान कोण याहीपेक्षा संघटनात्मकदृष्ट्या सिद्ध कोण झाले या प्रश्नाच्या उत्तरात सर्वाधिक गुण मिळतात ते संग्राम जगताप यांना! महापौर म्हणून पायउतार झाल्यानंतर झाल्यानंतरच्या पहिल्याच मनपा निवडणुकीत (२००९) संदीप कोतकर यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे ९ नगरसेवक निवडून आले होते! त्याचवेळी संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे १४ नगरसेवक निवडून आले होते. यानंतर दुसर्‍या टर्ममध्ये (२०१३) संग्राम जगताप हे महापौरपदावरुन पायउतार झाल्यानंतरच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक निवडून आले होते. याचाच अर्थ संघटनात्मकदृष्ट्या नेतृत्व सिद्ध झाले ते संग्राम जगताप यांचे!

नगरच्या नगरपालिकेची सन २००३ मध्ये महानगरपालिका झाली. भानुदास कोतकर हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असताना देशासह राज्यात काँग्रेसची मोठी हवा होती. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून त्यांनी नगरला महापालिका मंजूर केली. महापालिकेचा कलश त्यांनी सर्व शहरात फिरवला. लागलीच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या कोतकरांची हवा असतानाही शिवसेनेला बहुमत मिळाले होते. शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडुन आल्याने भगवान फुलसौंदर पहिले महापौर झाले. त्यावेळी कोतकर- जगताप एकत्र होते. तरीही शिवसेनेलाच नगरकरांनी पसंती दिली. त्यावेळी संदीप कोतकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला कोणत्याही गुन्ह्यात अटक नव्हती. तरुण आणि स्वच्छ चेहरा म्हणूनच संदीप कोतकर यांचीच इमेज होती. यानंतर शिवसेनेत बंडाळी झाली. शहर प्रमुख गणेश भोसले असताना किशोर डागवाले, दिपक सूळ, योगीता सत्रे यांच्यासह दहा नगरसेवकांनी बंड केले. या बंडानंतर संदीप कोतकर महापौर झाले. त्याचवेळी नगरला संदीप कोतकर आणि दिप चव्हाण हे दोन महापौर भेटले. दिपक सूळ उपमहापौर म्हणून काम पाहू लागले. म्हणजेच शिवसेनेत पहिली फूट पाडली ती भानुदास कोतकर यांनी!

केडगाव हा भानुदास कोतकर यांचा राजकीय बालेकिल्ला! कोतकर सांगतील तीच पूर्वदिशा असे येथील समिकरण! महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत कोतकरांनी नेतृत्व करत पक्षाचे ९ नगरसेवक निवडून आणले. त्यात केडगावमधील ५ नगरसेवक होते. त्यात कोतकर पिता- पुत्रही होते! केडगावमधील एका जागेवर कोतकर यांचे कट्टर विरोधक शिवसेनेचे दिलीप सातपुते हे विजयी झाले. सातपुते यांच्या विरोधात स्वत: भानुदास कोतकर यांनी उभे राहावे अशी गळ घालूनही कोतकर यांनी त्यास नकार दिला. सातपुते यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून येऊ द्यायचे नाही असा चंग बांधला गेल्यानंतरही दिलीप सातपुते हे त्यावेळी निवडून आले! म्हणजेच सत्तास्थान ताब्यात असतानाही केडगावमध्ये दिलीप सातपुते यांना संदीप कोतकर हे रोखू शकले नाही!मागील म्हणजेच २०१८ च्या निवडणुकीत दिलीप सातपुते यांचा पराभव झाला असला तरी त्यावेळी निवडणुकीची सुत्रे संग्राम जगताप यांच्या हातात होती. कारण, त्या निवडणुकीवेळी कोतकर कुटुंब हत्याकांडात आरोपी होऊन जेलमध्ये होते! जिल्ह्यातील सर्वात मोठी समजली जाणारी बाजार समिती कोतकर यांच्या ताब्यात होती. भानुदास कोतकर यांचे त्यावर एकहाती वर्चस्व होते. शहरातील आडते व्यापारी ताब्यात होते. तरीही त्याच बाजार समितीच्या आसपासच्या प्रभागात काँग्रेस म्हणजेच कोतकर समर्थक मोठ्या मतांनी पराभूत झाले. हवाई सुंदरीला उमेदवारी दिली असतानाही नगरकरांनी कोतकरांच्या या ‘हवाई सुंदरी’ला घरी बसवल्याची नोंद आहे.

१ जुलै २००६ ते ३१ डिसेंबर २००८ पर्यंत संदीप कोतकर महापौर होते. या कालावधीत मोठे काम केल्याचादावा आजही त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. यानंतर डिसेंबर २००८ मध्ये महापालिका निवडणूका झाल्या. त्या निवडणुकीत ६५ पैकी कोतकरांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला अवघ्या ९ जागांवर विजय मिळवता आला. त्यातील केडगावमध्ये सहा जागा होत्या. त्यापैकी फक्त ५ जागा काँग़्रेसला आल्या. त्यात दिलीप सातपुते हे कोतकरांचे कट्टर विरोधक निवडून आले. अन्य चार जागांवर झेंडीगेट परिसरातून सुरैय्या लियाकत शेख, पाईपलाईन परिसरातून बाळासाहेब पवार व निखील वारे आणि तोफखाना परिसरातून धनंजय जाधव हे अन्य चारजण काँग्रेसचे निवडून आले. हे चारही जण त्यांच्या कर्तुत्वावर निवडून आले. त्यात कोतकर अथवा काँग्रेसचा फारसा संबंध नाही. महापौर असताना संदीप कोतकर यांनी मोठे काम केले असते तर त्यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे फक्त ९ नगरसेवक कसे निवडून आले, हा प्रश्न आजही निरुत्तरीत आहे. म्हणजेच यातून संदीप कोतकरांच्या राजकीय नेतृत्वाबद्दल त्याचवेळी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. कोतकर आणि जगताप यांच्यात राजकीय संघर्ष नवीन नाही! दोघांचेही राजकीय पक्ष वेगवेगळेच राहिलेत. कोतकर हे काँग्रेसमध्ये सक्रिय असताना २००६ मध्ये संग्राम जगताप हे शिवसेनेत गेले होते. त्याच्या आधी त्यांना काँग्रेसचे युवक अध्यक्षपद देण्यात आले. मात्र, त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला आणि ते पद नाकारले. शिवसेनेत गेल्यानंतर पुढे झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवाजीराव कर्डिले यांना राष्ट्रवादीची लोकसभेची उमेदवारी देण्याचे निश्चित झाल्यानंतर जगताप यांनी सेनेला जय महाराष्ट्र केला आणि त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

जानेवारी २००९ मध्ये संग्राम जगताप पहिल्यांदा महापौर झाले. काँग्रेस- राष्ट्रवादीची त्यावेळी आघाडी होती. त्या निवडणुकीत जगताप समर्थक १४ नगरसेवक निवडून आले आणि काँग़्रेसचे ९ नगरसेवक आले. म्हणजेच संदीप कोतकर यांच्या तुलनेत संग्राम जगताप यांचा स्ट्राईक रेट त्यावेळीच जास्त होता. यानंतर १ जुलै २०११ मध्ये सौ. शिलाताई अनिल शिंदे या शिवसेनेच्या महापौर झाल्या. २०१३ ची निवडणूक संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली झाली. त्यावेळी ते राष्ट्रवादीचे अध्यक्षही होते. केडगावमध्ये राष्ट्रवादीचा एकही उमेदवार न उभा करता उर्वरीत शहरात त्यांनी राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक निवडून आणले. यानंतर २०१४ मध्ये संग्राम जगताप हे विधानसभेवर निवडून गेले. कोतकर- जगताप यांच्या राजकीय वाटचालीत नातेसंबंध असूनही कोणाला कोणामुळे राजकीय किंमत मोजावी लागली या प्रश्नाचं उत्तरही शोधावे लागणार आहे. कोतकरांचा राजकीय जन्म होण्याआधी अरुणकाका जगताप हे नगराध्यक्ष होते. त्यावेळी कोतकर हे केडगावचे सरपंच, नगर पंचायत समितीचे उपसभापती असा त्यांचा प्रवास होता. त्यावेळी कोतकर हे अरुणकाकांचे कार्यकर्ते अन् शिवाजीराव कर्डिले यांचे कट्टर विरोधक होते.

अरुणकाका जगताप यांनी कर्डिलेंना कधीच ललकारले नाही. कोतकरांना जवळ केले तरी त्यांनी कर्डिलेंच्या विरोधात कोतकरांना फूस लावली नाही. कर्डिले- कोतकर यांच्यात सोयरीक झाली त्यावेळी दोघांच्याही समर्थकांना घाम फुटला होता. पुढे जाऊन जगताप या दोघांचेही व्याही झाले. अशोक लांडे खून प्रकरणाशी जगताप- कर्डिले यांचा थेट संबंध कधीच आला नाही. मात्र, कोतकरांना अटक झाल्यानंतर पाहुणे म्हणून त्यांना मदतीची भूमिका घेताना त्याचा त्रास शिवाजीराव कर्डिले यांना जसा झाला तसाच संग्राम जगताप यांनाही झाला. फरक इतकाच की कर्डिलेंना अटक झाली ती लांडे खून प्रकरणात कोतकरांना मदत केल्याप्रकरणी तर संग्राम जगताप यांना अटक झाली ती केडगाव दुहेरी हत्याकांडात! या हत्याकांडाशी जगताप यांचा थेट संबंध नव्हता! मात्र, त्या पोटनिवडणुकीत जगताप यांनी त्यांच्या पक्षाचा अथवा त्यांचा समर्थक कार्यकर्ता नसतानाही कोतकर समर्थक उमदेवाराच्या प्रचारात आणि मतदानादिवशी मतदान केंद्रावर तळ ठोकला, त्यातून राजकीय आकसातून संग्राम जगताप हे आरोपी झाले आणि त्यांना अटक झाल्याचा आरोप आहे. राजकीय किंमत मोजण्याची मोजपट्टी घेतली तर त्याचे परिणाम कोतकरांपेक्षाही भोगावे लागले ते कर्डिले- जगताप यांना! येत्या काही दिवसात नगरमधील जगताप-कोतकर यांच्यात संघर्ष होतो किंवा कसे यासाठी थोडंसं थांबावं लागणार आहे.

शिवाजीराव कर्डिले दोन जावयांमधील संघर्ष थोपविण्यात यशस्वी होणार का?
संदीप कोतकर यांच्या तुलनेत संग्राम जगताप यांचे नेतृत्व पहिल्यापासूनच सिद्ध होत गेल्याचे दिसून येते. कोतकर- जगताप यांच्यात नातेसंबंध असले तरी दोघांच्याही भूमिका वेगवेगळ्या राहिल्याचे सर्वश्रूत आहे. कधीकाळी अरुणकाका जगताप यांचे समर्थक कार्यकर्ते म्हणून भानुदास कोतकर यांचा शहरात राबता असायचा! काळाच्या ओघात कोतकरांनी बाळासाहेब थोरात यांच्या मार्फत विलासराव देशमुखांशी गट्टी जमवली आणि राजकीय वरदहस्त मिळताच नगर शहराच्या राजकारणात- समाजकारणात ते आले. त्यातूनच संदीप कोतकर यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. आपल्या समोर भारतीय बैठक मारणारा कार्यकर्ता खुर्चीत बसला असतानाही अरुणकाका जगताप यांना त्याबाबत काहीच वाटले नाही. विनीत पाऊलबुद्धे या तरुणाकडून हात पत्कारावी लागल्यानंतर शांत राहिलेल्या त्याच अरुणकाका जगताप यांना दोनवेळा विधान परिषदेत आमदार म्हणून काम पाहण्याची संधी मिळाली. कोतकर आणि जगताप यांच्या राजकीय महत्वाकांक्षेत सँडवीच होत असताना दिसतेय ते शिवाजीराव कर्डिले यांचे! संदीप आणि संग्राम हे दोघेही त्यांचे जावई! प्राप्त राजकीय परिस्थितीत जगताप- कोतकर यांच्यातील राजकीय संघर्ष थंड करण्यात शिवाजीरावांना यश येते की काय हे पाहण्यासाठी थोडंस थांबावं लागणार आहे.

संग्राम जगताप यांचा स्टाईक रेट वाढताच!
संग्राम जगताप पहिल्यांदा महापौर झाले त्यावेळी त्यांच्या सोबत ६५ पैकी ३७ नगरसेवक राहिले. दुसर्‍यांदा म्हणजेच २०१३ मध्ये संग्राम जगताप महापौर झाले त्यावेळी त्यांच्यासोबत ६५ पैकी ४० नगरसेवक राहिले. पुढे संग्राम जगताप २०१४ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळी त्यांना ५० हजार मते मिळाली. दुसर्‍या निवडणुकीत संग्राम जगताप यांना ८२ हजार मते मिळाली. गेल्या लोकसभा म्हणजेच विखे पाटील विरुद्ध नीलेश लंके यांच्या निवडणुकीत लंके यांना नगर शहरात ७२ हजार मते मिळाली होती तर विखे पाटील यांना ३२ हजार जास्तीची मते मिळाली होती. त्याआधीच्या विधानसभा निवडणुकीत अनिलभैय्या राठोड यांना २०१९ च्या निवडणुकीत ७० हजार मते मिळाली होती तर संग्राम जगताप यांना ८२ हजार मते मिळाली होती. स्ट्राईक रेटचा विचार केला तर संग्राम जगताप यांचा स्ट्राईक रेट उजवाच असल्याचं यातून दिसतं.

कोतकरांसाठी मदतीला धावलेल्या संग्राम जगताप यांना झाली होती अटक!
संग्राम जगताप १ जानेवारी २००९ मध्ये महापौर झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणूक झाली. त्यावेळी संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या १८ जागा निवडून आल्या होत्या. त्या निवडणुकीत केडगावमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार कोतकरांनी देऊ दिला नव्हता. कोतकरांनी तेथे काँग्रेसचे सर्व उमेदवार दिले. त्यावेळी संदीप कोतकर यांना जिल्हाबंदी होती. त्यावेळी ते निवडून आले. मात्र, शिक्षा लागल्याने राजीनामा द्यावा लागला. पोट निवडणुकीत विशाल कोतकर निवडून आले. त्यावेळी संग्राम जगताप यांनी निवडणुकीची धुरा सांभाळली होती. त्यावेळी गुलाल अंगावर पडलेल्या विशाल कोतकर याला दुहेरी हत्याकांडात अटक झाली होती. केडगावमध्ये एकही जागा राष्ट्रवादीला नव्हती. पोटनिवडणुकीत विशाल कोतकर हा कोतकरांचा उमेदवार! संग्राम जगताप हे कोतकरांसाठी तळ ठोकून राहिले. त्यातच दुहेरी हत्याकांड घडले आणि संग्राम जगताप आरोपी झाले. त्यात त्यांना अटकही झाली. लांडे खून प्रकरणाशी शिवाजी कर्डिले यांचा थेट संबंध नव्हता. मात्र, पुरावा नष्ट करण्यात मध्यस्थी केल्याचा आरोप झाला आणि त्यांना अटक झाली होती.

कोतकरांच्या सोबत असूनही अरुणकाका जगताप यांचा पराभव
महापालिका स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत म्हणजेच सन २००३ मध्ये झालेल्या निवडणुकीत पाईपलाईन- गुुुलमोहोर रोड परिसरातील प्रभागातून तत्कालीन माजी नगराध्यक्ष राहिलेल्या अरुणकाका जगताप यांनी उमेदवारी केली होती. त्यावेळी अत्यंत नवख्या समजल्या जाणार्‍या विनीत पाऊलबुधे यांच्याकडून जगताप पराभूत झाले होते. या निवडणुकीनंतर जगताप हे २००८ पर्यंत सक्रिय राजकारणातून बाहेर राहिले. म्हणजेच नगर शहरात त्यावेळी भानुदास कोतकर आणि अनिलभैय्या राठोड यांचेच राजकीय साम्राज्य होते. कोतकरांच्या सोबतीला जगताप गेेले असतानाही जगताप यांचा त्यावेळी पराभव झाला होता!

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लोकसभेला ‘ब्रेक’ घेतलेले नितीन दिनकर विधानसभेला विजयाचा ‘गिअर’ टाकणार

काँग्रेसचा बालेकिल्लाला भाजप सुरुंग लावणार श्रीरामपूर | नगर सहयाद्री:- राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कोणत्याही...

टाकळी ढोकेश्वर सरपंच विरोधात अविश्वास ठराव बारगळला

टाकळी ढोकेश्वर सरपंच विरोधात अविश्वास ठराव बारगळला बाळासाहेब खिलारी गटाने फटाके फोडत केला आनंद साजरा पारनेर/प्रतिनिधी...

आता ‘ही’ माझी शेवटची निवडणूक; माजी मंत्री शिवाजी कर्डिले स्पष्ट्च बोलले..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लवकर शेतकऱ्यांना दुधाच्या जोडधंद्यासाठी...