नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता राहुल गांधी यांच्यापेक्षा जास्त आहे, असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनी केल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांना काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.
एका मुलाखतीत कार्ती चिदंबरम म्हणाले, राहुल गांधी यांच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिक लोकप्रिय आहेत. या वक्तव्यावरून काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे प्रमुख के. आर. रामस्वामी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
दहा दिवसात त्यांनी उत्तर द्यावे असे समितीने म्हटले आहे. याच मुलाखतीत चिदंबरम यांनी ईव्हीएमवरही विश्वास दाखवला आहे. काँग्रेसकडून ईव्हीएम प्रणाली सदोष असल्याचे आरोप होत असताना ईव्हीएम विश्वासार्ह असल्याचे वक्तव्य कार्ती यांनी केले आहे. या दोन्ही वक्तव्यांमुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.