बारामती। नगर सहयाद्री
लोकसभा निवडणुकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांची अधिकृत घोषणा होणे आता बाकी आहे. शुक्रवारी (ता.१६) सकाळपासूनच बारामती शहरामध्ये सुनेत्रा पवार यांच्या कामाची माहिती देणारा प्रचार रथ फिरू लागल्यामुळे सुनेत्रा पवार याच आगामी उमेदवार असणार हे जवळपास निश्चित आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बूथ कमिटी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबत अधिकृत घोषणा करतील, अशी शयता वर्तवली जात आहे. यामुळे नणंद विरुद्ध भावजय अशी लढत रंगणार असे आता जवळपास निश्चित झाले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे खासदार आहेत. सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या पत्नी असून अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर आता बारामती लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी देणार याबाबत कमालीची उत्सुकता होती. देशातील सर्वाधिक लक्षवेधी लढत म्हणून या लढतीकडे पाहिले जाईल.
बारामतीत झालेल्या मेळाव्यामध्ये अजित पवार यांनी मीच उमेदवार आहे, असे समजून प्रत्येकाने मतदान करावे असे आवाहन केले होते. त्याच वेळेस सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील अशी शयता वर्तवली जात होती. बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या कामाची माहिती देणारा प्रचार रथ फिरू लागल्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा प्रारंभ झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान काल सुनेत्रा पवार यांनी आमदार राहुल कुल व त्यांच्या पत्नी कांचन कुल यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. या सर्व पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवर येत्या काही दिवसात अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शयता वर्तवली जात आहे.