कोलकाता
लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांनी ’एकला चलो’चा नारा दिला आहे. ममता बॅनर्जी यांनी टीएमसी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. ममतांच्या या घोषणेने विरोधी आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे.
ममता बॅनर्जी यांनी ही घोषणा केली तेव्हा त्यांच्या बोलण्यातून उपेक्षेची वेदना आणि कटुताही दिसून आली. त्या म्हणाल्या, मी ज्या काही सूचना दिल्या, त्या सर्व फेटाळल्या. एवढे झाल्यावर आम्ही एकट्याने बंगालला जायचे ठरवले आहे. राहुल गांधींचे नाव न घेता त्या म्हणाल्या की, ते पश्चिम बंगालच्या दौर्यावर जाणार असल्याची माहितीही दिली गेली नाही. या सगळ्याबाबत आमच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. हे पूर्णपणे चुकीचे आहे. लोकसभा निवडणुकीसाठी २८ विरोधी पक्ष इंडिया अलायन्सच्या माध्यमातून एका व्यासपीठावर आले होते.
विरोधकांनी एकजूट करून भाजप नेतृत्वाखालील एनडीएला आव्हान देण्याची योजना आखली होती; मात्र आता बंगालमध्ये ममतांनी विरोधी आघाडीला मोठा धक्का दिला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या, माझी काँग्रेस पक्षाशी कोणतीही चर्चा झाली नाही. बंगालमध्ये आम्ही एकटेच लढू, असे मी नेहमीच म्हटले आहे. देशात काय होईल याची मला चिंता नाही, पण आम्ही एक धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत आणि बंगालमध्ये आम्ही एकटेच भाजपचा पराभव करू. मी इंडिया आघाडीचा एक भाग आहे. राहुल गांधींची न्याय यात्रा आमच्या राज्यातून जात आहे पण आम्हाला त्याची माहिती देण्यात आली नाही.