अहमदनगर / नगर सह्याद्री –
लोकसभा निवडणुकीच्या तिसर्या टप्प्यातील मतदान ७ मेला पार पडले. तर ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. अशात राज्यात सर्व पक्षातील नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप होतांना दिसत आहे. त्याचसोबतच राज्याच्या राजकारणात अनेक नवीन मुद्यांची भर पडली आहे. काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा मु्द्या सध्या ऐरणीवर आहे. तर भाजपने नवनवीन मुद्यांवर काँग्रेसाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
अशातच महाविकास आघाडीतील नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तिखट हल्ला चढवला आहे. चार जून नंतर मुख्यमंत्री एकतर तडीपार होतील किंवा जेलमध्ये जाती असा हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते राऊत यांनी भाजपसह मुख्यमंत्र्यांवर पुन्हा एकदा टीका केली आहे.
देशात मोदी हे प्रचाराच्या नावाखाली धुडगूस घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा ठेवलेली नाही. मोदींची तब्येत ठीक नाही, त्यांची गाडी रूळावरून घसरलेली आहे. अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ४ जूनपर्यंत काय तांडव करायचा आहे ते करू देत. आणि शिंदेंनी भ्रष्टाचारावर बोलावे, स्वतःच्या भ्रष्टाचारामुळे ते गळपटले होते. आता ४ जूननंतर शिंदे हे तडीपार होतील अथवा जेलमध्ये जातील, असा दावा राऊतांनी केला आहे. त्यांचा या वादग्रस्त विधानानंतर पुन्हा एकदा राजकारण तापले आहे.