जळगाव । नगर सहयाद्री:-
जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या ऐतिहासिक ‘दगडी इमारत’ विक्रीचा निर्णय सध्या जिल्ह्यात मोठा वादाचा विषय ठरत असून, या निर्णयामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. बँकेचे चेअरमन संजय पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्यात थेट आरोप-प्रत्यारोपांची मालिका रंगली आहे.
बँकेच्या नवी पेठ परिसरातील पुरातन ‘दगडी इमारत’ ही शतकाहून अधिक काळ बँकेच्या ओळखीचा भाग राहिलेली आहे. मात्र, संचालक मंडळाने ही इमारत विक्रीस काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
खडसे यांचा तीव्र विरोध
बँकेचे ज्येष्ठ संचालक असलेल्या आमदार एकनाथ खडसे यांनी इमारतीच्या विक्रीला कडाडून विरोध नोंदवला असून, “ही केवळ मालमत्ता नसून, शेतकऱ्यांच्या भावना याच्याशी जोडलेल्या आहेत,” असे नमूद करत चेअरमन संजय पवार यांना पत्र दिले आहे. त्यांनी ६२ कोटींच्या अंदाजे किमतीच्या मालमत्तेला कमी म्हणजे २२ कोटींना विकण्याचा आरोप करत निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
संजय पवारांचा पलटवार
यावर संजय पवार यांनी खडसे यांच्या कार्यकाळातील मालमत्तांच्या विक्रीचे दाखले देत पलटवार केला. “तुमच्या कार्यकाळात सुद्धा मालमत्ता विकल्या गेल्या, मग आज विरोध का?” असा सवाल उपस्थित करत, निर्णयात पारदर्शकता असल्याचा दावा केला.
पालकमंत्र्यांची उडी आणि इशारा
दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील यामध्ये उडी घेत बँकेच्या निर्णयावर टीका केली आहे. “६२ कोटींची मालमत्ता केवळ २२ कोटींना विकली जातेय, हे कुणाच्या फायद्यासाठी?” असा रोखठोक सवाल त्यांनी केला. संचालक मंडळाने हा निर्णय घेतल्यास आपण विरोध करणार, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे.
“चांगलं गिर्हाईक आणा, आम्ही चांगल्या भावात विकू” – संजय पवार
यावर संजय पवार यांनी टोला लगावत, “चांगलं गिर्हाईक आणा, आम्ही त्यालाच विकू,” असे प्रत्युत्तर देत राजकीय टीकाकारांना खुलं आव्हान दिलं आहे. या सर्व घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. यामुळे जिल्हा बँकेतील पुढील निर्णयप्रक्रिया व राजकीय समीकरणांवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.