अहिल्यानगर | नगर सह्याद्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले आहेत. पंतप्रधानांमुळे अहिल्यानगरला वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले आहे. जनतेने काहींना सर्व बाजुने नाकारले आहे, असे रिकामटेकडे वैद्यकीय महाविद्यालयाचे राजकारण करत आहेत, असा टोला पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी विरोधकांचे नाव न घेता लगावला.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिंडी सोहळ्याच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन आणि दिंडी चालकांची संयुक्त बैठक घेतली. त्यानंतर राजस्व सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. पालकमंत्री विखे म्हणाले की, राज्यातील इतर जिल्ह्यात ही वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालेले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील जागेसाठी समिती स्थापन केलेली आहे. या समितीच्या अहवालानंतर महाविद्यालयाची जागेची निश्चती होणार आहे. हे वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यासाठी मंजूर झाले आहे. जिल्ह्यात दक्षिण-उत्तर असे विभाजन नसते.
कोणीही एकत्र आल्याने भाजपला फरक पडणार नाही
शिवसेना-मनसे एकत्र आल्याने भाजपला काहीही फरक पडणार नाही. भाजपचे सदस्य संख्या ही सर्वात जास्त आहेत. भाजप हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. भाजपला कोणीही एकत्र आल्याने काहीही फरक पडणार नाही. जनता भाजपबरोबर आहे. संजय राऊत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना संपवतील, अशी टीका जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. दरम्यान भाजपमध्ये येण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. पक्ष प्रवेशाबाबत आमदार सत्यजित तांबे यांच्याशी कोणतेही बोलणे झालेले नाही असे त्यांनी स्पष्ट केले.