मुंबई / नगर सह्याद्री : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्ष जोर लावून आहेत, भाजपला शह देण्यासाठी इंडिया आघाडी प्रयत्नशील आहे. परंतु जागावाटपावरून त्यांच्यात एकमत होताना दिसत नाही.
राज्यातही महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून धुसपूस सुरूच आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख करत टीका होत आहे. यासंदर्भात बोलताना शरद पवार यांनी मोठे विधान केले असून आता निवडणूक लढणार नाही, हे मी ठरवलेय असे शरद पवार यांनी म्हटलंय.
खासदरकीचा सध्याचा कार्यकाळ संपल्यानंतर मी निवडणूक लढवणार नाही. अडीच वर्षांनंतर माझी खासदारकी संपेल. त्यानंतर निवडणूक लढवणार नाही. माझी खासदारकीची टर्म शिल्लक असून तोपर्यंत काम करत राहणार आहे. मला लोकांनी तिथे पाठवले आहे. तिथे काम करु नको का? असा सवालही त्यांनी केला आहे. १९६७ पासून राजकारणात आहे.
माझ्या विरोधकांनीही कधी वयावरून टीका केली नाही. अनेक संस्थांचा आजीवन अध्यक्ष आहे. तिथे मी काम करत राहणार आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे. राम दर्शनावरूही ते म्हणाले की, गर्दीत रामाच्या दर्शनाला जाणार नाही. राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर जाईन.