सुपा | नगर सह्याद्री
आमदार नीलेश लंके यांनी आपल्या पदाचा राजीनामा २९ मार्च रोजी झालेल्या सुपा येथील मेळाव्यात देताच तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलू लागली आहे. आमदार लंके यांचे कट्टर समर्थक पाडळी रांजणगावचे सरपंचविक्रमसिंह कळमकर व शिरपूरचे सरपंच भास्कर उचाळे यांनी देखील लंके यांची साथ सोडत अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने तालुक्यात राजकीय भूकंप झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रांताध्यक्ष खा सुनील तटकरे, नगर दक्षिण जिल्हाअध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, अहमदनगर जिल्हा बँक संचालक प्रशांत गायकवाड, जेष्ठ नेते मधुकरराव उचाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्ष पदी पाडळी रांजणगाव येथील सरपंच विक्रमसिहं कळमकर यांची तर युवक तालुका अध्यक्ष म्हणून शिरापुरचे सरपंच भास्कर उचाळे यांची नियुक्ती केली.
यावेळी अजित पवार यांनी १ तासाचा वेळ देत पारनेर येथून गेलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत पारनेर तालुक्यातील राजकीय स्थितीबाबत कळमकर यांच्याकडून आढावा घेतला. नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष विक्रमसिहं कळमकर,युवक तालुका अध्यक्ष भास्कर शिरोळे यांच्या निवडीचे आमदार संग्राम जगताप, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत दादा गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा तालुक्याचे ज्येष्ठ नेते मधुकर उचाळे मा. नगराध्यक्ष विजय औटी, यांनी अभिनंदन केले आहे.