पारनेर । नगर सहयाद्री
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची पारनेर शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांनी मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी भेट घेतली.
नगर तालुक्यात भेटीगाठी दौरा चालू असताना डॉ. श्रीकांत पठारे यांना तातडीने मुंबईला बोलवण्यात आले होते. यावेळी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, खासदार अरविंद सावंत, आमदार मिलिंद नार्वेकर, अहिल्यानगरचे शिवसेना संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे, पारनेर तालुक्यातील गटप्रमुख संतोष येवले, संतोष साबळे उपस्थित होते. मातोश्री निवासस्थानी झालेल्या बैठकीबाबत डॉ.श्रीकांत पठारे यांनी माहिती दिली आहे.
डॉ.श्रीकांत पठारे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या मोठ्या सहकार्याने महाविकासआघाडीकडून खा.नीलेश लंके विजयी झाले असून त्यावेळी त्यांनी दिलेल्या शब्दानुसार पारनेर-नगर मतदारसंघाची जागा शिवसेनेला सोडावी असा आग्रह शिवसेनेने धरला आहे. तसेच खा. नीलेश लंके हे पारनेर तालुक्यातील आहेत व तेही जूने शिवसैनिक आहेत, त्यामुळे खासदार राष्ट्रवादीचे असल्याने विधानसभेची जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे असा आग्रह सर्व शिवसैनिकांचा आहे. याबाबत सर्व अहवाल मातोश्रीवर सादर केला असून महाविकासआघाडीच्या सर्व नेत्यांना याची माहिती दिलेली आहे.
तसेच शिवसेनेच्या सर्वच वरीष्ठ नेत्यांनी याबाबत सकारात्मक भुमिका मांडली असून आपल्याकडून मतदारसंघात केलेल्या उपक्रमांचा आढावा व चालू असलेल्या प्रचाराचा आढावा गावनिहाय व बूथनिहाय या बैठकीत आपण मांडले आहे. कोणत्याही परिस्थितीत पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघावर महाविकासआघाडीकडून शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकवणार असल्याचे डॉ. श्रीकांत पठारे यांनी सांगितले आहे.